देश-विदेश

पाकिस्तानच्या एका निर्णयाने भारताच्या नंबर 1 विमान कंपनीचे झाले 8000 कोटींचे नुकसान …


जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. 1960 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये स्वाक्षरी झालेला सिंधू जल करार स्थगित केला. यानंतर, घाबरलेल्या पाकिस्तान सरकारने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे.

म्हणजेच पाकिस्तानवरून उड्डाण करणाऱ्या सर्व भारतीय विमान कंपन्यांवर बंदी घातली आहे.

पाकिस्तानच्या या निर्णयामुळे भारतातील नंबर 1 ची विमान कंपनी असलेल्या इंडिगोला तब्बल 8000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. यामुळे इंडिगोच्या शेअर्समध्ये 5% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. त्यामुळे शेअर 5193 रुपयांच्या खालच्या पातळीवर गेला आहे. इंडिगोच्या शेअर्समध्ये झालेल्या या घसरणीचे मुख्य कारण शेजारील देश पाकिस्तान असल्याचे मानले जात आहे. अमेरिका व युरोपला जाणाऱ्या विमानांचा वेळ 2 ते 3 तासांनी वाढण्याची शक्यता आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचली आहेत. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताने या हल्ल्याला पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. भारताच्या या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय नोंदणीकृत विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारताच्या आर्थिक हितांना धक्का देण्यासाठी घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे भारतीय विमान कंपन्यांना पश्चिमेकडे जाणाऱ्या मार्गांवर (अमेरिका, युरोप आणि मध्य पूर्व) मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्याची परवानगी नसल्याने विमानांना लांबचा मार्ग घ्यावा लागत आहे, ज्यामुळे इंधन खर्च आणि वेळ वाढला आहे.

इंडिगो विमान कंपनीला मोठा आर्थिक फटका

इंडिगो ही भारतातील सर्वात मोठी आणि जगातील सर्वात मूल्यवान विमान कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे बाजार मूल्य 23.45 अब्ज डॉलर आहे. परंतु, पाकिस्तानच्या या निर्णयामुळे इंडिगोच्या शेअर्समध्ये 25 एप्रिल 2025 रोजी 5% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. त्यामुळे कंपनीला 8000 कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे.

इंडिगोच्या शेअरची स्थिती

गेल्या 1 वर्षात इंडिगोच्या शेअरने गुंतवणूकदारांना 39 टक्के परतावा दिला आहे तर गेल्या 3 महिन्यांत जेव्हा एकूण शेअर बाजारात घसरण दिसून येत होती, तेव्हा या शेअरने गुंतवणूकदारांना 27 टक्के परतावा दिला आहे तर गेल्या एका महिन्यात या शेअरने 6 टक्के परतावा दिला आहे. इंडिगोच्या शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता पसरली आहे. इंडिगोच्या सीईओ पीटर एल्बर्स यांनी 2030 पर्यंत कंपनीला जागतिक विमान कंपनी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, परंतु या पाकिस्तानच्या या निर्णयामुळे त्यांच्या या योजनेवर परिणाम होऊ शकतो.

पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राच्या बंदीमुळे इंडिगोला आपल्या आंतरराष्ट्रीय मार्गांवर बदल करावे लागले आहेत. उदाहरणार्थ, शारजा ते अमृतसर या मार्गावरील इंडिगोच्या विमानाला पाकिस्तानी हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच मोठा वळसा घ्यावा लागत आहे. या लांबच्या मार्गामुळे विमानांचा इंधन खर्च वाढला आहे, आणि प्रवाशांना 2 ते 3 तास जास्त प्रवास करावा लागत आहे. यामुळे इंडिगोला ऑपरेशनल खर्चात वाढ आणि नफ्यात घट यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

पाकिस्तानच्या या निर्णयाचा परिणाम फक्त इंडिगोवरच नाही तर संपूर्ण भारतीय विमान वाहतूक क्षेत्रावर झाला आहे. एअर इंडिया आणि स्पाइसजेट यांसारख्या इतर विमान कंपन्यांनाही या बंदीचा फटका बसला आहे. पश्चिमेकडे जाणाऱ्या मार्गांवर (अमेरिका, युरोप, मध्य पूर्व) वेळ आणि इंधन खर्च वाढल्याने विमान कंपन्यांना तिकीट दर वाढवावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.

तसेच या बंदीचा परिणाम फक्त भारतीय विमान कंपन्यांवरच झाला आहे. ब्रिटिश एअरवेज, कतार एअरवेज आणि एमिरेट्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्याची परवानगी आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना आर्थिक नुकसान होत असताना परदेशी कंपन्यांना फायदा होत आहे. काही तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय भारतीय विमान कंपन्यांना लक्ष्य करून घेण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button