शेअर मार्केटमध्ये फुटला ‘ट्रम्प टॅरिफ बॉम्ब! सेन्सेक्स ९३० अंकांनी धडामधूम

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं जाहीर केलेला टॅरिफ बॉम्ब आज, शुक्रवारी शेअर बाजारात फुटला. ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर जागतिक मंदीच्या शक्यतेच्या संकेतांमुळं सेन्सेक्स १.२२ टक्के म्हणजेच ९३०.६७ अंकांच्या घसरणीसह ७५३६४.६९ च्या पातळीवर बंद झाला.
तर निफ्टीनंही जोरदार आपटी खाल्ली. निफ्टी १.४९ टक्के म्हणजेच, ३४५.६५ अंकांनी घसरला आणि २२९०४.४५ अंकांवर स्थिरावला. विशेष म्हणजे, सेन्सेक्सची इंट्रा डे निचतम पातळी ७५,२४०.५५ अंक, तर निफ्टीची इंट्रा डे निचतम पातळी २२८५७.४५ अंकांवर राहिली.
रिपोर्ट्सनुसार, सेन्सेक्समध्ये आज सर्वाधिक घसरण ही टाटा स्टीलच्या शेअरमध्ये दिसून आली. टॉप ३० कंपन्यांमध्ये टाटा स्टीलचे शेअर ८.५९ टक्क्यांच्या घरसणीसह स्थिरावले. तर टाटा मोटर्सचे शेअर बाजार बंद होताना ६.१५ टक्क्यांच्या घसरणीवर व्यवहार करत होते. एलटी, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, टेक महिंद्रा यांसारख्या दिग्गज कंपन्यांची अवस्था बिकट झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे, ३० पैकी २४ कंपन्यांचे शेअर घसरणीसह स्थिरावले.
मार्केट जाम, पण शेअरची धूम
सेन्सेक्सच्या समभागांमध्ये टाटा मोटर्स, टाटा स्टील, इन्फोसिस, लार्सन अँड टुब्रो, मारुती आणि टेक महिंद्राच्या शेअरमध्ये घसरण नोंदवली गेली. तर एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. टाटा स्टीलचे शेअर जवळपास ४.५ टक्क्यांच्या घसरणीसह १४६.७५ रुपयांवर आले. ओएनजीसी शेअरमध्येही ६ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. येस बँकेचे शेअरही ३ टक्क्यांनी घसरले.
जगभरातील मार्केटही जाम
आशियाई शेअर बाजारांमध्येही आठवड्याच्या अखेरच्या दिवशी घसरण नोंदवली गेली. जपानच्या निक्केईमध्ये ३.१४ टक्क्यांची, तर कोरियाच्या कॉस्पीमध्ये ०.८ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. चीनच्या मार्केटला आज सुट्टी होती.
अमेरिकी बाजारात भूकंप
डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या टॅरिफ धोरणानंतर चीननंही जोरदार पलटवार केला. त्यामुळं अमेरिका-चीनमध्ये ट्रेड वॉर सुरू झाल्याचं दिसून आलं. चीननं अमेरिकेकडून आयात सर्व उत्पादनांवर ३४ टक्क्यांचा अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम अमेरिकेच्या शेअर मार्केटवर झाला. अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक डाउ जोन्स इंडस्ट्रिअल अॅव्हरेज आणि नेसडॅक व्यतिरिक्त एस अँड प ५०० निर्देशांकात मोठी घसरण नोंदवली गेली.