
अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 सादर केले आहे. गेल्या ११ तासांपासून या विधेयकावर चर्चा होत आहे. अशातच संसदेत एक मोठी घटना घडली आहे.
एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वक्फ विधेयक फाडले आहे. विरोध म्हणून आपण हे विधेयक फाडत असल्याचे सांगत ते लोकसभेतून निघून गेले आहेत.
या विधेयकाला केंद्र सरकारचा भाग असलेल्या टीडीपी, जेडीयू आणि एलजेपी यांनी पाठिंबा दिला. ठाकरे गटानेही ते या विधेयकाच्या विरोधात आहेत की नाही हे स्पष्ट केले नाही. अशातच ओवेसी यांनी सुमारे अर्धा तास या विधेयकावर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजपा देशात संघर्ष निर्माण करत असल्याचा आरोप केला. तसेच महात्मा गांधी यांनी जसे आफ्रिकेत कायदा फाडलेला तसे मी हे वक्फ विधेयक फाडत असल्याचे सांगत लोकसभेत वक्फ विधेयक फाडत विरोध दर्शविला आहे.
या विधेयकाचा उद्देश मुस्लिमांना अपमानित करणे आहे. हे कलम २५, २६ चे उल्लंघन आहे. हे विधेयक मुस्लिमांवर अन्याय करणारे आहे, असा आरोप त्यांनी केला.
नॅशनल कॉन्फरन्सचे मियां अल्ताफ म्हणाले की, आणले जाणारे विधेयक मुस्लिमांच्या विरोधात आहे. तुम्ही राज्य सरकारांचे अधिकार हिसकावून घेतले आहेत. आम्हाला या देशाचा अभिमान आहे. हे एका विशिष्ट वर्गाविरुद्ध आणण्यात आले आहे. भारत धर्मनिरपेक्षतेसाठी ओळखला जातो. हे विधेयक त्या धर्मनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.
दरम्यान, केरळ काँग्रेसने वक्फ विधेयकाला पाठिंबा दिला आहे. लोकसभेत वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान विधेयकाचे समर्थन करताना, केरळ काँग्रेसचे खासदार अॅडव्होकेट के फ्रान्सिस जॉर्ज यांनीही दुरुस्तीसाठी काही सूचना केल्या आहेत.