मोबाईल पाण्यात पडल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाने डोक्यात घातला दगड! महिलेचा मृत्यू …

जालना : जालण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मोबाईल पाण्यात टाकून खराब केल्याच्या रागातून सातवीतल्या मुलाने डोक्यात दगड घालून गावातील महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिराबाई बोंढारे (वय 41) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना घनसावंगी तालुक्यातल्या अंतरवाली टेंभी गावात घडली आहे. 13 वर्षीय अल्पवयीन मुलानेच हे कृत्य केल्याचे जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाने खुनाची कबुली दिली असून त्याला बाल सुधार गृहात पाठवण्यात येणार आहे.
ही घटना उघडकीस कशी आली?
25 मार्च रोजी घनसावंगी तालुक्यातील टेंभी अंतरवली या गावामध्ये मिराबाई बोंढारे या 41 वर्षीय महिलेच्या खुण झाल्याचे उघडकीस आले होते. पोलिस आरोपीचा माग काढत होते. त्यानंतर पुराव्यांचा आधारे पोलिसांनी गावात चौकशी केली. या महिलेच्या शेताजवळ राहणाऱ्या 13 वर्षीय मुलाची चौकशी केली असता या मुलानेच खूनाची कबुली दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिराबाई यांनी फोन लावण्यासाठी त्यांच्या शेता शेजारी राहणाऱ्या 13 वर्षाच्या मुलाकडून मोबाईल घेतला. तेंव्हा त्याचा फोन पाण्यात पडून खराब झाला. मोबाईल पाण्यात पाडून खराब केल्याच्या रागातून या अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात महिलेच्या डोक्यात दगड घातला.
यात महिलेचा मृत्यू झाला. यानंतर याप्रकरणाचा तपास जालना गुन्हा शाखेकडून सुरू होता. संबंधित घटनेविषयी चौकशी सुरु असताना शेताजवळ राहणाऱ्या मुलाची पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर महिलेचा खून केल्याची कबूली मुलाने दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.