शिक्षिकेनं विद्यार्थ्याच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, आणि सुरु झाला खेळ!

शिक्षकी पेशाला काळिमा फासल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. या प्रकरणात शिक्षिकेनं तिच्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली.
पण, तिचा हा खेळ फार काळ चालला नाही. या शिक्षिकेसह तिच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
आयटी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरुमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. श्रीदेवी रुदागी (वय 25) असं या प्रकरणातल्या आरोपी शिक्षिकेचं नाव आहे. श्रीदेवीला तिचे सहकारी गणेश काळे (वय 38) आणि सागर (वय 28) यांच्यासह अटक करण्यात आली आहे.
या सर्वांवर सतीश (बदललेले नाव) यांच्याकडून 4 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. हे पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी फोटो आणि व्हिडिओची भीती दाखवून सतीशकडून 20 लाखांची खंडणी मागितली होती.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश हे पश्चिम बेंगळुरुमधील व्यावसायिक आहेत. त्यांना तीन मुली असून त्यांनी सर्वात लहान पाच वर्षांच्या मुलीचे जवळच्या शाळेत 2023 सावी नाव नोंदवले होते. या प्रवेशाच्या दरम्यान सतीशची श्रीदेवीशी भेट झाली. त्यांनंतरही हे दोघं एकमेकांशी मेसेज आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात होते. त्यासाठी त्यांनी वेगळे सिम आणि फोन वापरल्याचीही माहिती आहे.
त्यानंतर या दोघांच्या भेटी वैयक्तिक बनल्या. त्याचा फायदा घेत श्रीदेवीनं सतीशकडून 4 लाख रुपये उकळले. त्यानंतर जानेवारी महिन्यात त्यांच्याकडून 15 लाखांची मागणी केली. सतीशनं ते देण्यास टाळाटाळ केल्यानंतर श्रीदेवी त्याच्या घरी उधारीचे 50,000 रुपये घेण्याच्या बहाण्याने पोहोचली होती.
सतीश यांना व्यवसायात फटका बसला. त्यामुळे त्यांनी कुटुंबासह गुजरातमध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना मुलीचे शाळेतून ट्रान्सफर सर्टिफिकेट हवे होते. त्यामुळे मार्च महिन्यात पुन्हा एकदा श्रीदेवी आणि सतीश संपर्कात आले.
सतीशनं केलेल्या दाव्यानुसार श्रीदेवीच्या कार्यालयात त्यांना खासगी फोटो आणि व्हिडिओ दाखवून धमकावण्यात आले. त्यावेळी काळे आणि सागर देखील तिथं उपस्थित होते. त्यांनी सतीशकडं 20 लाखांची मागणी केली.
सतीशनं त्यांच्याशी वाटाघाटी केल्यानंतर त्यांनी ही रक्कम 15 लाखामंपर्यंत कमी केली. त्यांच्या मागण्या कायम असल्यानं सतीशनं पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपीला अटक केली आहे.