ऐका, नाहीतर बॉम्ब वर्षावासाठी तयार रहा’, अमेरिकेची सरळ सरळ ‘या’ देशाला धमकी …

राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प सतत चर्चेत आहेत. आपले वेगवेगळे निर्णय, आयात कर वाढवण्याचा निर्णय, दुसऱ्या देशांना धमक्या अशा निर्णयांमुळे डोनाल्ड ट्रम्प चर्चेत आहेत.
आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सरळसरळ एका देशाला हल्ल्याची धमकी दिली आहे. हा देश आहे इराण. मागच्या चार दशकापासून अमेरिका आणि इराणमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत. अमेरिकेने आतापर्यंत अनेकदा इराणला इशारे दिले आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यापुढे एक पाऊल टाकत इराणला थेट बॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे. इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमाची जगभरात चर्चा आहे. इराण बऱ्याच वर्षांपासून अणूबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अणवस्त्रासारख घातक अस्त्र इराणच्या हाती लागू नये, यासाठी अमेरिका-इस्रायल हे देश अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे या दोन देशांनी इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमात अडथळे आणले आहेत.
- इराणने अणवस्त्र विकसित करु नये, यासाठी डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्यावर दबाव टाकत आहेत. इराणने त्यांच्या अणवस्त्र कार्यक्रमासंबंधी अमेरिकेशी डील करावी, अशी डोनाल्ड ट्रम्प यांची अट आहे. इराणने ऐकलं नाही, तर त्या देशावर बॉम्ब हल्ला करण्याची आणि टॅरिफ लावण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. मागच्या आठवड्यात इराणने अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ही प्रतिक्रिया आली आहे. ‘त्यांनी डील केली नाही, तर तिथे बॉम्बवर्षाव होईल’, असं ट्रम्प टेलिफोन इंटरव्यूमध्ये म्हणाले. ‘याआधी त्यांनी पाहिला नसेल, असा बॉम्ब वर्षाव करु’ असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. “त्यांनी ऐकलं नाही, डील केली नाही, तर सेकंडरी टॅरिफ लावण्याच पाऊल सुद्धा मी उचलू शकतो, जे चार वर्षांपूर्वी मी केलं होतं” असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय.
याच धोरणाचा पुनरुच्चार
इराणने त्यांच्या अणवस्त्र कार्यक्रमासंबंधी डील करावी, यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला पत्र पाठवलं. त्यावर इराणने ओमानच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. लष्करी धमक्या आणि कितीही दबाव टाकला जात असला, तरी अमेरिकेशी थेट चर्चा करण्याचं आमचं धोरण नाहीय, असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून सांगण्यात आलं. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्किया यांनी रविवारी याच धोरणाचा पुनरुच्चार केला. थेट चर्चेचा प्रस्ताव त्यांनी फेटाळला. पण इराणने नेहमीच अप्रत्यक्ष चर्चा केली आहे, आताही त्यासाठी आम्ही तयार आहोत असं मसूद पेजेश्किया यांनी सांगितलं.