पत्नीकडून छळ, स्टेटस ठेवून तलाठ्यानं दिला जीव, म्हणाला, ‘मेल्यावर पत्नीला …

अकोला जिल्ह्यातील तेलहारा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील तहसील कार्यालयात तलाठी म्हणून काम करणाऱ्या शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘व्हाट्सअप’वर स्टेटस ठेवून त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला.
पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या केल्याचं त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेट्स नमूद केलं आहे. पत्नीकडून आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचं आरोप त्यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये केला आहे. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी शिलानंद यांनी आपल्या पत्नीसाठी कविता लिहिली होती. आता जिच्यासाठी कविता लिहिली त्याच पत्नीच्या छळाला कंटाळून शिलानंद यांनी आत्महत्या केली आहे.
स्टेटसमध्ये काय लिहिलंय?
शिलानंद यांनी व्हॉट्सअॅपवर ठेवलेल्या स्टेटसमध्ये त्यांनी म्हटलं की, पत्नीच्या भावाला शेतीसाठी पैसे हवे होते. यासाठी शिलानंद यांनी स्वत:च्या नावावर कर्ज काढलं होतं. मात्र प्रत्यक्षात पत्नीच्या भावाने हे हफ्ते फेडण्यास नकार दिला. त्यामुळे शिलानंद यांना दरमहिना व्यासासह याचे पैसे द्यावे लागत होते. याशिवाय पत्नीकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचं त्यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे.
पत्नी अश्लील शिवीगाळ करते. गेल्या पाच दिवसांपासून मी जेवण केलं नाही, असंही त्यांनी स्टेटसमध्ये म्हटलं आहे. माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा कोणीही पाहिला तरी चालेल, पण पत्नीला दाखवू नका, असं त्यांनी म्हटलं आहे. मृत्यूपूर्वीच त्यांनी मृत्यूपत्र लिहित संपूर्ण संपत्ती मुलाच्या नावावर केली आहे. असं त्यांनी स्टेटसमध्ये म्हटलं आहे. शिलानंद यांना एक मुलगा एक मुलगी आहे.
उत्कृष्ठ कामासाठी आमदाराकडून पुरस्कार
तलाठी म्हणून काम करताना फेरफार प्रणाली मध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे काही काही वर्षांपूर्वी शिलानंद तेलगोटे यांचा आमदार प्रकाश भारसाकळे यांनी सत्कार केला होता. शिलानंद तेलगोटे हे मुळचे अकोट येथील रहिवासी असून तेलहारा तहसील कार्यालयात काम करत होते. 12 मार्च रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो, चार वर्षांपूर्वी त्यांनी एक फेसबुक पोस्ट करून आपल्या पत्नीसाठी कविताही टाकली होती. साथीदार जेव्हा सोबत असतो, तेव्हा प्रवास छानच होतो, असं त्यांनी कवितेत म्हटलं होतं. पण आता शिलानंद यांनी पत्नीवर गंभीर आरोप करत आत्महत्या केली आहे.