क्राईम

4 मशीन सतत 8 तास मोजत होत्या रक्कम, बंगल्यातील अलीबाबाची गुफा पाहून ईडी अधिकाऱ्यांना धक्का …


अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांकडून गेल्या काही वर्षांपासून जोरदार कारवाया सुरु आहेत. अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी रक्कम मिळाली आहे. आता आयएएस अधिकारी संजीव हंस यांच्या प्रकरणात ईडीने काही अधिकाऱ्यांकडे छापे टाकले.

 

त्या छाप्याने खळबळ उडावी, अशी माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्याच्या बंगल्यात इतकी रोकड सापडली की नोटा मोजण्यासाठी चार मशीन मागवाव्या लागल्या. सतत 8 तास नोटांची मोजणी सुरु होती.

 

अकरा कोटींची रक्कम जप्त

बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता तारिणी दास यांच्या निवासस्थानी अनेक ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये त्यांच्या घरातून अकरा कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आहे. दास यांच्या घरीच नाही तर त्यांच्या नातेवाईकांकडेही छापेमारी करण्यात आली. सरकारी निविदा मॅनेज करण्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे. आयएएस अधिकारी संजीव हंस यांच्याशी संबंधित प्रकरणात ईडीकडून ही कारवाई केली गेल्याचे सांगण्यात आले.

 

निविदा घोटाळ्यासंदर्भात ईडीचे पथक ही कारवाई करत आहे. या घटनेने पाटणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. यामध्ये आणखी अनेक जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईडीची टीम प्रत्येक पैलूंचा बारकाईने तपास करत आहे.

 

निवृत्तीनंतर पुन्हा मोठी जबाबदारी

तारिणी दास हे 31 ऑक्टोबर 2024 रोजी मुख्य अभियंता या पदावरून निवृत्त झाले होते. परंतु सेवानिवृत्तीनंतर पुढच्याच महिन्यात त्यांना पुन्हा त्याच पदावर दोन वर्षांच्या करारावर नियुक्त करण्यात आले. याशिवाय बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये मुख्य महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांना देण्यात आला होता. या प्रकरणाचा राज्यातील अनेक बड्या अधिकाऱ्यांशी संबंध असण्याची शक्यता असून त्यात अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

 

पटणा येथील उच्चभ्रू वस्तीत बंगल्यात बेनामी संपत्ती असल्याचा इनपूट ईडीला मिळाला होता. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली. ईडीने छापा मारल्यावर बंगल्यातील दृश्य पाहून अधिकाऱ्यांना धक्काच बसला. नोटांचा मोठा डोंगरच अधिकाऱ्यांना मिळाला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button