म्यानमार भूकंपात १०,००० हून अधिक मृत्यू, जगभरातून मदतीचा ओघ; भारताने काय मदत केली?

म्यानमारमध्ये शुक्रवारी आलेल्या ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत अधिकृतपणे १,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून २,२०० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत.
पण ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या जियोलॉजिकल सर्व्हे (USGS) संस्थेने तर मृतांचा आकडा १०,००० पेक्षा जास्त होऊ शकतो, असा दावा केला आहे. या भूकंपामुळे म्यानमार सरकारने देशाच्या मोठ्या भागात आणीबाणी जाहीर केली आहे.
हा भूकंप इतका जोरदार होता की त्याचे झटके थायलंडची राजधानी बँकॉकपासून ते भारताच्या मणिपूर आणि मेघालयापर्यंत जाणवले. थायलंडमध्येही यामुळे ६ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.
भारताची तातडीची मदत: ऑपरेशन ब्रह्मा –
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत म्यानमार आणि थायलंडला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. भारताने “ऑपरेशन ब्रह्मा” सुरू करत शनिवारी म्यानमारला १५ टनांहून अधिक मदत सामग्री पाठवली. यात तंबू, ब्लँकेट, झोपण्याच्या पिशव्या, अन्नाचे पॅकेट, स्वच्छता किट, जनरेटर आणि औषधांचा समावेश आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, ही मदत यांगून विमानतळावर पोहोचली आहे.
हा भूकंप इतका घातक का ठरला?
म्यानमारमधील सागांग फॉल्ट हा भूकंपप्रवण भाग आहे. २०१२ मध्ये येथे ६.८ रिश्टर स्केलचा भूकंप आला होता, ज्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. पण शुक्रवारचा भूकंप गेल्या ७५ वर्षांतील सर्वात मोठा होता, असे रॉयटर्सने म्हटले आहे. हा भूकंप जमिनीपासून फक्त १० किमी खोलवर होता, त्यामुळे झटके तीव्र होते आणि इमारतींना त्याची पूर्ण झळ बसली.
किती नुकसान?
USGS च्या अंदाजानुसार, मृतांचा आकडा १०,००० ते १,००,००० पर्यंत जाऊ शकतो. तसेच, आर्थिक नुकसान म्यानमारच्या जीडीपीच्या ७०% पर्यंत पोहोचू शकते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. सागांग क्षेत्र हे मंडालेसारख्या दाट लोकवस्तीच्या भागाजवळ आहे आणि तिथले बांधकाम भूकंप सहन करण्याइतके मजबूत नाही. १९५६ नंतरचा हा सर्वात मोठा भूकंप असल्याने घरे आणि इमारती उद्ध्वस्त झाल्या.
जगभरातून मदतीचा ओघ –
चीन, रशिया, भारत, मलेशिया, सिंगापूरसह अनेक देशांनी म्यानमारला मदत पाठवली आहे. दक्षिण कोरियाने २० लाख डॉलरची मदत जाहीर केली, तर अमेरिकेनेही सहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे. २०२१ च्या सैन्य तख्तापलटानंतर म्यानमार आधीच गृहयुद्धाने त्रस्त आहे, त्यात हा भूकंप संकटात भर टाकणारा ठरला आहे.