हायकोर्टाने दिलासा देताच कुणाल कामराने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; मुंबई पोलिसांसमोर.

प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराच्या नावावरून बराच गोंधळ सुरू आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध विनोदी कलाकाराने वादग्रस्त विधान केल्यापासून सर्वत्र गदारोळ माजला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंग्यात्मक भाष्य केल्याने कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कुणाल कामराला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. दरम्यान, या कॉमेडियनने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याने अटकपूर्व जामीनासाठी मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती.
कुणाल कामराने दाखल केलेल्या याचिकेवर मद्रास हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावर हायकोर्टाने कुणाल कामराला दिलासा दिला आहे. कामराला हायकोर्टाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्याला अंतरिम दिलासा देण्यात आला आहे. 7 एप्रिलपर्यंत कुणाल कामराला अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
त्यानंतर आता कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. 31 मार्च रोजी कुणाल कामरा हा चौकशीसाठी मुंबई पोलिसांसमोर हजर राहणार असल्याचे समजते आहे.
कुणाल कामराने स्वतःला निर्दोष घोषित केले
कुणाल कामराचे वकील व्ही. सुरेश यांनी न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्यासमोर तातडीने सुनावणीसाठी याचिकेचा उल्लेख केला. गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी ई-फायलिंग सिस्टमद्वारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी कुणाल कामरा यांनी असा युक्तिवाद केला आहे की त्यांच्याविरुद्ध आरोप असलेल्या गुन्ह्यांमध्ये ते निर्दोष आहेत आणि त्यांना या प्रकरणात खोटे अडकवण्यात येत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचा वापर केल्याबद्दल एका कलाकाराला त्रास देणे, धमकावणे आणि सेन्सॉरशिप करणे अशी तक्रार कॉमेडियनने दाखल केली आहे.
कुणाल कामरावर हक्कभंग
कुणाल कामरा विरोधात शिंदे गटासह महायुतीने आक्रमक पवित्रा घेतला. तर ठाकरे गटाने कुणाल कामरा याची बाजू उचलून धरली होती. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कुणाल कामराची कविता पुन्हा एकदा त्याच चालीमध्ये बोलून दाखवली होती. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हेच सत्य असून ते बोलले तर का मिरच्या झोंबल्या असा सवाल देखील अंधारेंनी उपस्थित केला होता. यानंतर आता विधीमंडळामध्ये सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.
कुणाल कामराचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विनोदी कलाकार कुणाल कामरा यांच्या टिप्पणीमुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. कॉमेडीच्या माध्यमातून त्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली आहे. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराच्या नाट्यमय घडामोडींवर त्याने विंडबनात्मक गाणे गायले आहे.
या गाण्यात त्याने एकनाथ शिंदेंचे नाव न घेता गद्दार असा शब्द वापरला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानतर शिवसैनिकांनी त्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाची तोडफोड करत त्याला इशारा दिला आहे. विशेष म्हणजे कुणाल कामराने हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरून शेअरही केला आहे.