
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. देशमुख खून प्रकरणात मास्टरमाइंड समजल्या जाणाऱ्या सुदर्शन घुलेनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
आपणच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा काटा काढला अशी कबुली सुदर्शनं घुलेनं पोलीस तपासात दिली आहे. याबाबतचा कबुलीजबाब कोर्टात सादर करण्यात आला आहे. मात्र गुन्ह्याची कबुली देत असताना सुदर्शन घुले याने सगळा गेम फिरवला आहे.
या प्रकरणी सुदर्शन घुले स्वत: अडकत असताना आता त्याने शेवटच्या क्षणी वाल्मिक कराडचं नाव घेतलं आहे. यामुळे वाल्मीक कराडसमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. खरंतर, ज्यावेळी संतोष देशमुख यांचा खून झाला, त्यावेळी या प्रकरणात वाल्मीक कराडचं काहीच कनेक्शन समोर येत नव्हतं. सुरुवातीला त्याला केवळ अवादा कंपनीला मागितलेल्या दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात आरोपी करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर वाल्मिकवर मोक्का अंतर्गत कारवाई करत संतोष देशमुख खून प्रकरणात देखील आरोपी करण्यात आलं.
आता सुदर्शन घुलेच्या कबुलीमुळे वाल्मीक कराडच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून हे प्रकरण वाढलं अशी कबुली दिली आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी बुधवारी बीड न्यायालयात युक्तिवाद केला होता. ज्यात वाल्मीक कराडने खंडणीला आडवा आला तर संतोष देशमुखांना कायमचा धडा शिकवा, असं सुदर्शन घुलेला सांगितलं होतं, अशी कबुली दिल्याचा युक्तिवाद केला होता. शिवाय काही पुरावेही कोर्टात सादर केल्याचं सांगितलं होतं.
आता सुदर्शन घुलेला अटक केल्यानंतर त्याने पोलीस कोठडीत संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याची कबुली दिल्याचं मान्य केलं आहे. घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी देखील हत्येची कबुली दिली आहे. सुदर्शन घुले हाच टोळीप्रमुख असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र हे सगळं वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून केलं, असं सुदर्शन घुलेनं पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.
संतोष देशमुखांना का मारलं?
सुदर्शन घुले याने पोलिसांना सांगितले की, आमचा मित्र प्रतिक घुलेचा वाढदिवस असताना आम्हाला संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. त्याचा राग मनात होता. त्याशिवाय, संतोष देशमुख हा खंडणीत अडथळा ठरत होता. त्यामुळेच संतोष देशमुखाला संपवण्यात आल्याची कबुली सुदर्शन घुले याने दिली.