महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं संकट? 8 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

दिवसा उष्णता वाढत असली तरी रात्री आणि पहाटेच्या सुमारास हवेत गारवा निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे सतत हवापालट होत आहे. याचा परिणाम आंबा, काजू, शेती, संत्री, द्राक्ष या सारख्या फळबागांवर होत असल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे.
दुसरीकडे सतत हवापालट होत असल्यानं शेतकरीच नाही तर सर्वसामान्य लोकांनाही याचा मोठा त्रास होत आहे.
ही हवापालट होण्याचं मोठं कारण म्हणजे दक्षिणेकडे कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. त्याचा मोठा फटका दक्षिणेतील राज्यांना बसत आहे. कर्नाटकात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात हे चक्रीवादळ धडकणार नसलं तरी त्याचा परिणाम हवामानावर होणार आहे.
दिवसभर चढणारे ऊन, घामाच्या धारा, वाढणारा उकाडा, संध्याकाळनंतर अचानक सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि हवेत गारवा निर्माण होतो. त्यानंतर पाऊस पडतो. अचानक पावसामुळे रात्री आणि पहाटे हवेत गारवा निर्माण होतो, मात्र नंतर उष्णता वाढते असं सध्या दुहेरी संकट आहे. एकीकडे वाढणारी उष्णता दुसरीकडे अवकाळी पाऊस यामध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे.
पुन्हा एकदा सायक्लोनिक सर्क्युलेशनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रात हवापालट झाली असून मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने आता पुन्हा एकदा 8 जिल्ह्यांसाठी अलर्ट दिला आहे. त्याच वेळी दुसरीकडे दिवसा तीन ते चार डिग्री तापमान वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकणपट्ट्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा 29 आणि 30 मार्च रोजी देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत यावेळी कोरडं किंवा ढगाळ वातावरण राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात गारवा राहील, तर काही भागात पावसाच्या तुरळक सरी बरसतील. कोल्हापूर, घाटमाथ्यावर मात्र ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सातारा आणि घाटमाथ्यावर देखील 29 आणि 30 मार्च रोजी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. सांगली, सोलापूरमध्येही पाऊस पडेल. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीडमध्ये हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रात वातावरण कोरडं राहणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात मागच्या 24 तासात 38 ते 40 डिग्री तापमानाची नोंद अनेक जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. तर पुढचे तीन दिवस तापमान वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.