‘शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, ते फक्त …’ संभाजी भिडेंचे विधान

गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण सुरु आहे. अशातच आता संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावर असलेली वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन मोठी मागणी केली आहे.
वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कोणताही संबंध नाही त्यामुळे ती समाधी हटवण्यात यावी अशी मोठी मागणी केली आहे. याबाबत आता शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मोठे विधान केले आहे.
काय म्हणाले संभाजी भिडे?
‘रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजी भिडे यांनी समर्थन दिले आहे. संभाजीराजे भोसले बोलतात ते 100 टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलं आहे आणि ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे. माणसं एकनिष्ठ नसतात,तेवढी कुत्री असतात, निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे,याचे धोतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथंच पाहिजे,’ असं ते म्हणालेत.
यावेळी संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हिंदूत्ववादी होते या नितेश राणे यांच्या वाक्याचेही समर्थन केले. “छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मीय नव्हते ते फक्त हिंदुत्ववादी होते. मात्र इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराजांचे नाव राजकारणात वापरण्याचा हाव असलेल्या लोकांनी हे चिकटवले. ते आपल्या सोयीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असल्याचा,” आरोप हे संभाजी भिडे यांनी यावेळी केला.