क्राईम

हत्येच्या 18 महिन्यानंतर महिला जिवंत परतली, तिच्या हत्येप्रकरणी 4 जण भोगताहेत तुरुंगवास


मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक आणि तितकीच चक्रावून टाकणारी घटना समोर घडली आहे. 18 महिन्यांपूर्वी जिची हत्या झालेली, जिच्यावर कुटुंबाने अंत्यसंस्कारही केलेसे आणि जिच्या हत्येप्रकरणी 4 जण तुरुंगवास भोगताहेत अशी महिला जिवंत परत आली आहे.

ललिता असे या महिलेचे नाव असून तिने स्वत: पोलीस स्थानकात हजर राहत आपण जिवंत असल्याची पुष्टी केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

दोन मुलांची आई असलेली ललिता दीड वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी कुटुंबियांकडून पोलीस स्थानकात तक्रारही दाखल करण्यात आली. ललिताच्या हातावर टॅटू आणि पायाला काळा धागा बांधलेला असल्याची खूण कुटुंबाने पोलिसांना सांगितली होती. याच दरम्यान पोलिसांना महिलेचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला होता. या महिलेच्या हातावरही टॅटू आणि पायाला काळा धागा बांधलेला होता.

 

पोलिसांनी तात्काळ ललिताच्या कुटुंबाशी संपर्क साधला. ती ललिताच असल्याची खात्री पटल्यानंतर कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेत तिच्यावर अंत्यसंस्कार केले. दुसरीकडे, पोलिसांनी ललिताच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल करत चार आरोपींना अटक केली. इम्रान, शाहरूख, सोनू आणि एजाज अशी चौघांची नावे आहेत. चौघांवर खुनाचा खटला चालला आणि न्यायालयाने त्यांची तुरुंगात रवानगी केली.

 

आता जवळपास 18 महिन्यानंतर ललिता आपल्या घरी परतली आहे. तिला जिवंत पाहून वडिलांना धक्काच बसला. यानंतर त्यांनी तिला ताबडतोब पोलीस स्थानकात नेले आणि अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यामुळे आता पोलिसांपुढेही नवे आव्हान उभे राहिले आहे. ललिता जिवंत असून अंत्यसंस्कार झालेला मृतदेह कुणाचा होता? त्या महिलेचे नाव काय? तिच्या हत्येच्या प्रकरणाचे काय? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले आहेत.

 

ललितासोबत काय घडलं?

दरम्यान, ललिताने आपण एवढे दिवस कुठे होते हे सांगितले आहे. ललिता शाहरूख नावाच्या तरुणासोबत भानुपारा येथे गेली होती. दोन दिवस तिथे राहिल्यानंतर तिला दुसऱ्या व्यक्तीला 5 लाख रुपयांना विकण्यात आले. यानंतर दीड वर्ष ती कोटा येथे राहत होती आणि संधी मिळताच तिथून ती पळाला व गावी आली. ओळख पटवण्यासाठी तिने तिचे आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्रही दाखवले आहे. गांधी सागर पोलीस स्थानकाच्या प्रभारी तरुणा भारद्वाज यांनीही ललिता जिवंत असल्याचे सिद्ध झाले असून कुटुंबासह शेजाऱ्यांनीही तिची ओळख पटवल्याचे सांगितले.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button