साधी बॅग समजून लुटली, उघडताच चोरांच्या पायाखालची जमीन सरकली …

छोटी-मोठी चोरी करणाऱ्या चोरांनी नेहमीप्रमाणे एक चोरी केली ज्यात त्यांनी एक बॅग लुटली होती. बॅगेमध्ये थोडेफार पैसे असतील, असं चोरांना वाटलं पण त्यांनी जेव्हा ही बॅग उघडली तेव्हा त्यांना धक्काच बसला.
बॅगमध्ये पाहिल्यानंतर दोन्ही चोरांचा स्वत:च्या डोळ्यावरही विश्वास बसला नाही, कारण बॅगमध्ये तब्बल 80 लाख रुपये होते.
80 लाख रुपयांचा जॅकपॉट लागल्यामुळे चोरांना फारच आनंद झाला, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. पोलिसांनी 24 तासांच्या आत या दरोड्याची केस सॉल्व्ह केली आणि दोन आरोपींना अटक केली. दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी 79 लाख 50 हजार रुपये जप्त केले.
80 लाख रुपयांच्या या दरोड्याचं सीसीटीव्ही फुटेज मोठ्याप्रमाणावर व्हायरल झालं होतं, यानंतर पोलिसांच्या अनेक पथकांनी दरोडेखोरांचा शोध घेतला. यानंतर पोलिसांना दोन्ही दरोडेखोरांना पकडण्यात यश आलं आहे. दिल्लीच्या लाहोरी गेट परिसरात दोन दिवसांपूर्वी ही 80 लाख रुपयांची चोरी झाली होती.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये फक्त एकच दरोडेखोर दिसत होता, जो हातात बॅग आणि पिस्तुल घेऊन पळून जात होता. या सीसीटीव्ही फुटेजभोवती पोलिसांनी दुसऱ्या आरोपीच्या हालचाली पाहिल्या. त्यानंतर दुसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चोर कुचा महाजनी परिसरात बॅगमध्ये पैसे घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्यांवर किंवा लोकांवर लक्ष ठेवत असत. सोमवारी (17 मार्च) संध्याकाळी, पीडित व्यक्ती नेहमीप्रमाणे 80 लाख रुपये घेऊन लाहोरी गेटच्या कुचा घासी राम येथून हैदर कुली परिसरात त्याच्या दुसऱ्या फर्ममध्ये जात होते. तेव्हा समीर नावाच्या एका चोराने बंदुकीचा धाक दाखवून त्यांची बॅग लुटली. या दरोड्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले. या चोरांनी पीडित व्यक्तीची अनेक वेळा रेकीही केली होती.
पीडित व्यक्तीच्या बॅगेत इतके पैसे असतील, असं दरोडेखोरांना वाटलंही नव्हतं. पण जेव्हा त्यांनी बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यांना जॅकपॉट लागल्यासारखच वाटलं. पम दिल्ली पोलिसांनी 24 तासांच्या आत दरोडेखोरांना अटक केली. मोहम्मद अली आणि समीर अशी आरोपींची नावं आहे. समीरनेच बंदुकीचा धाक दाखवून बॅग लुटली होती. पोलिसांनी दरोड्यासाठी वापरलेली पिस्तुल आणि काडतुसेही जप्त केली आहेत.