
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मागणीसाठी राज्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये सोमवारी दोन गटात हिंसक हाणामारी झाली आहे.
अचानक सुरू झाली दगडफेक
औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी, या मागणीसाठी नागपुरातील शिवाजी पुतळा चौकात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे सोमवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी औरंगजेबाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच पोस्टर फाडण्यात आले. यामुळे महाल परिसरात दिवसभर तणावाची स्थिती होती व पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. सायंकाळी दोन गटांत तणाव निर्माण झाला आणि अचानक दगडफेक आणि जाळपोळ झाली.
व्हिडिओ येथे पहा !
दगड, चाकू फेकून मारत होते…
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच आग विझवण्यासाठी दाखल झालेले अग्निशामक दलाचे जवान यांच्यावरही जोरदार दगडफेक करण्यात आली. यावेळी आंदोलक दगड, चाकू फेकून मारत आहेत, अशी प्रतिक्रिया आग विझवायला गेलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली. या घटनेत अनेक पोलिस अधिकारी-कर्मचारी जखमी झाले आहेत. शिवाय, परिसरातील वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे.