Nagpur – औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात तणाव, महालमध्ये दोन गटात दगडफेक…

नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. महाल परिसरामध्ये दोन गट आमने सामने आले आहेत. सकाळी औरंगजेबाच्या कबरीविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आलं होतं, यानंतर संध्याकाळी दोन गट आमने-सामने आले आहेत.
संतप्त जमावाने दगडफेक करत काही वाहनांची तोडफोडही केली आहे. महाल परिसरामध्ये तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.
नितीन गडकरींचं आवाहन
दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणे दुर्दैवी आहे, नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावे, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे.
नागपूर हे शांतता आणि सौहार्दासाठी देशभरात प्रसिद्ध असलेले शहर आहे. या शहरात जात-पंथ-धर्म या विषयावरून वाद किंवा भांडण होत नाही. आज जे काही घडले, त्यासंबंधी प्रशासन कार्यवाही करेलच. नागपूरच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता प्रस्थापित होईल, यासाठी स्वत: देखील प्रयत्न करावे, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.