नानांच्या ऑफरला एकनाथ शिंदेंचा नकार नाही; शिंदे- अजित दादा-काँग्रेस, आकड्यांचे गणित जुळणार…

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी होळीच्या सणाला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आमच्यासोबत या दोघांनाही आलटून पालटून मुख्यमंत्रीपद देतो, अशी खुली ऑफर दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकते हे मागील पंचवार्षिकमध्ये देशाने पाहिले आहे. पाच वर्षांमध्ये तीन वेगवेगळ्या पक्षांचे सरकार स्थापन झाले होते. महायुतीला सत्तेत येऊन 100 दिवस पूर्ण झाले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत जीव अडकलेला आहे, हे त्यांच्या काही विधानांवरुन दिसून आले आहे.
त्यामुळेच नाना पटोलेंनी स्पष्ट केले की भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत यावे आम्ही दोघांनाही आलटून पालटून मुख्यमंत्रीपद देतो.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या या खुल्या ऑफरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपशेल नाकारले देखील नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी रंग खेळत होते, तेव्हा पत्रकारांनी या ऑफरविषयी त्यांना विचारले, तेव्हा त्यांनी काँग्रेसची ऑफर स्पष्टपणे नाकारली किंवा फेटाळली नाही. एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आमचा रंग भगवा आहे. ज्याला भगवा परवडेल, आवडेल त्यांनी आमच्याच सोबत यावं. भगवा रंग हा वैश्विक आहे. भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे. सनातन धर्माचा आहे. त्यामुळे हा भगवा रंग कोणाचाही द्वेष करणारा नाही. तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा आहे. म्हणून ज्याला कोणाला वाटेल त्यांनी या भगव्या रंगात न्हाहून निघावं सोबत यावं, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.’
एकनाथ शिंदे यांची पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. तर अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाचा विक्रम केला आहे. त्यांनाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. मात्र संख्याबळाचा विचार करता महायुतीमध्ये त्यांना ही संधी सध्यातरी मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्यासोबतच अजित दादांचे मुख्यमंत्रीपदावर एक वाक्य प्रसिद्ध आहे, ज्यांच्याकडे 145 हा जादुई आकडा आहे तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो.