नवरीनं पाहिलं नवऱ्याला अन् जोरात किंचाळली, तिथंच मोडलं लग्न, असं काय घडलं?

कुशीनगर : लग्न हा आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. खरंतर ही एका नव्या आयुष्याची सुरुवात मानली जाते. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या लग्नाची आपापल्या परीनं अनोखी स्वप्न मनात जपत असतो.
आजकाल लग्नामध्ये डीजेला मोठी मागणी असते. डीजेच्या तालावर वऱ्हाडी अगदी दंग होतात. एका लग्नातही वऱ्हाड्यांनी डीजेवर नाचून नाचून मांडव दणाणून सोडला होता. परंतु पुढे जे घडलं ते प्रचंड धक्कादायक होतं.
19 फेब्रुवारीला संध्याकाळी साधारण 7 वाजताच्या दरम्यान वरात नवरीच्या मांडवात दाखल झाली. नवरीच्या पालकांनी नवऱ्याचं आणि आलेल्या वऱ्हाडाचा दणक्यात स्वागत केलं. लग्नाचा बार अगदी धुमधडाक्यात उडवून दिला. संजना आणि राहुल यांचं हे लग्न होतं. त्यात सर्वजण पोटभर जेवले. आहेर समारंभ आटोपला. मग रात्री 10 वाजता सुस्तावलेल्या वऱ्हाड्यांनी डीजे लावून नाचायला सुरुवात केली. बघता बघता हे गाणं लावा, ते गाणं वाजवा, असं म्हणताना नवरा आणि नवरीकडच्या पाहुण्यांमध्ये चांगलीच जुंपली.
दोन्हीकडचे वऱ्हाडी थेट मारहाणीवर पोहोचले. हा सगळा तमाशा नवरदेव समजूतदारपणे शांत करेल असं नवरीला वाटत होतं. त्यामुळे ती मोठ्या आशेनं त्याच्याकडे पाहत होती. मात्र नंतर क्षणात सारंकाही होत्याचं नव्हतं झालं. नवरीच्या हातावरील लालभडक मेहंदीवर अक्षरश: रक्ताचे शिंतोडे उडाले.
मांडवात डीजेवरून सुरू असलेला धुमाकूळ मिटवण्यासाठी नवरीचा भाऊ मध्ये पडला. तो थेट डीजे बंद करायलाच जात होता, तोच त्याच्यावर वऱ्हाड्यांनी धारदार हत्यारानं वार केले. यात नवरीचा भाऊ अजय पासवान जागीच कोसळला आणि लग्नाचं प्रसन्न वातावरण अचानक शोकांतिकेत बदललं. सर्वत्र किंकाळ्या घुमू लागल्या. हल्ल्यात नवरीकडील 3 लोक गंभीर जखमी झाले, अजय पासवान, सत्यम पासवान आणि रामा पासवान. नातेवाईकांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान अजय पासवानचा मृत्यू झाला. तर, दोघांवर उपचार सुरू आहेत.
उत्तर प्रदेशच्या कुशीनगरातील पैकौली लाला गावात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आठजणांना ताब्यात घेतलं आहे. तसंच लग्नाच्या व्हिडिओआधारे पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. संतापजनक बाब म्हणजे, घटनेनंतर वऱ्हाड्यांनी ताबडतोब तिथून पळ काढला. त्यात नवऱ्याचे कुटुंबीय आणि नवराही पळाला. दरम्यान, नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लग्न मागील वर्षीच होणार होतं, परंतु तेव्हा नवऱ्याच्या वडिलांचं निधन झाल्यामुळे वर्षभर लग्न थांबवलं. आता 19 फेब्रुवारीला हे लग्न उरकलं खरं, परंतु हत्याकांडामुळे मांडवातच मोडलं. नवरीच्या आनंदी घरावर आता जणू दु:खाचा डोंगर कोसळला आहे.