टीसीचा युनिफॉर्म; गळ्यात आयकार्ड, स्टेशनवर तिकीट चेक करायची महिला, 5 वर्षांनी समजला खरा झोल

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी देशभरातले अनेक युवक कित्येक वर्ष कठोर मेहनत आणि परीश्रम करतात, तर काही जण लाखो रुपयांची लाच देऊन सरकारी नोकरी मिळवतात, पण आता समोर आलेल्या एका घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे.
पाच वर्षांपासून तिकीट चेक करणारी महिला टीटीई नसल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सरकारी कर्मचारी असल्याचं भासवून या महिलेने रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासली.
लखनऊच्या चारबाग स्टेशनवर बऱ्याच काळापासून ही महिला टीटीई म्हणून वावरत होती. टीटीईचा ड्रेस आणि गळ्यात बनावट आयकार्ड घालून महिला वेटिंग रूममध्ये तिकीट चेक करायची. ही गोष्ट स्टेशन मास्तरच्या लक्षात येताच जीआरपीने लगेचच कारवाई केली आणि महिलेची चौकशी करायला सुरूवात केली. महिलेचं आयकार्ड चेक करताच सगळं सत्य समोर आलं, त्यानंतर महिलेला अटक करण्यात आली.
ही महिला टीटीईच्या ड्रेसमध्ये प्रवाशांची तिकीट तपासायची. तिकीट नसलेली व्यक्ती वेटिंग रूममध्ये असेल तर महिला दंड आकारायची. खऱ्याखुऱ्या टीटीई दिसण्यासाठी महिलेने टीटीईचा युनिफॉर्मही शिवून घेतला होता. तसंच आयकार्ड घेऊनही महिला फिरायची. पोलिसांनी आयकार्डचा नंबर तपासला तेव्हा महिला पाच वर्षांपासून चारबाग रेल्वे स्टेशनवर तैनात असल्याचं समोर आलं.
ज्या आयडीच्या आधारावर महिला पाच वर्ष रेल्वे स्टेशनवर काम करत होती, ते आयडीही बनावट होतं. याप्रकरणी पोलिसांनी भदोहीची रहिवासी काजल सरोजला अटक केली आहे. महिला फक्त स्टेशनवरच लोकांची तिकीटं तपासायची, ज्यात प्लॅटफॉर्म तिकीटाचा समावेश होता. ज्यांच्याकडे तिकीट नसायचं, त्यांच्याकडून काजल दंड म्हणून पैसे घ्यायची. हे पैसे थेट काजलच्या खिश्यामध्ये जायचे.