अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणारं खैरलांजी हत्याकांड; नेमकं काय घडलं होतं?

संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाली, डोळ्यांदेखत कुटुंब संपलं पण कुटुंबप्रमुख न्यायासाठी शेवटपर्यंत लढला. ही घटना आहे भंडारा जिल्ह्यातील भोतमांगे कुटुंबासोबत घडलेली. खैरलांजी येथे 29 सप्टेंबर 2006 रोजी एक अमानूष हत्याकांड घडले होते.
भैयलाल भोतमांगे यांच्या पत्नी,मुलगी, दोन मुलं यांची निर्घृणपणे हत्या केली होती. इतकंच नव्हे तर पत्नी आणि मुलीवर शारीरिक अत्याचारदेखील करण्यात आला होता. मात्र या हत्याकांडातून भैयालाल भोतमांगे बचावले. कसं ते जाणून घेऊया.
18 वर्षांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. समुहाकडून भोतमांगे कुटुंबातील चार जणांची सामूहिक हत्या करण्यात आली. भंडारा जिल्ह्यात खैरलांजी गावातील शेतकरी भैयालाल भोतमांगे यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगी आणि दोन मुलं होते असे पाच सदस्य होते. गावातीलच सिद्धार्थ नावाच्या व्यक्तीचा स्थानिक गावकऱ्यांसोबत शेतातील रस्त्यावरुन वाद सुरू होता. यावरुन गावकऱ्यांनी सिद्धार्थ याला मारहाण केली. त्यातून ते बचावले आणि त्यांनी पोलिसांत मारहाणीविरोधात तक्रार केली.
या प्रकरणात भैयालाल यांच्या पत्नीने पोलिसांपुढे साक्ष दिली होती. त्या प्रकरणात हल्लेखोर गावकऱ्यांना अटक झाली. मात्र नंतर ते जामिनावरही सुटले. पण भोतमांगे यांच्याविरोधात गावकऱ्यांचा रोष वाढला. संपूर्ण कुटुंबावर त्याचा राग वाढत होता. 29 सप्टेंबर रोजी ती हादरवणारी घटना घडली. हत्याकांडाच्या दिवशी गावातील 11 जणांच्या गटाने भैयालाल भोतमांगे यांच्या झोपडीला वेढा घातला तेव्हा त्यांची पत्नी, मुलगी आणि दोन मुलं घरातच होते. आरोपींनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत चौघांवर हल्ला करत त्यांची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर चौघांचेही मृतदेह शेतात लपवून पळून गेले. भैयालाल भोतमांगे हे शेतात काम करत होते त्यामुळं ते बचावले. समूहाने भैयालाल यांच्या मुलीवर आणि पत्नीवरही सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप होता.
मायलेकींवर अत्याचार करुन त्यांचे मृतदेह गावाबाहेरच्या कालव्यात फेकून देण्यात आले होते. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना हत्याकांडाच्या दुसऱ्या दिवशी भैयालाल यांच्या पत्नीचा मृतदेह सापडला होता. तर इतर पीडितांचे मृतदेह दोन दिवसांनंतर सापडले होते. पोलिसांनी या प्रकरणात 46 आरोपींना अटक केली होती. 2006 मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. भंडारा जलदगती न्यायालयाने या खटल्याचा निकाल सुनावताना १५ ऑक्टोबर २००८ मध्ये आठजणांना दोषी ठरवले होते. त्यानंतर २०१० मध्ये नागपूर खंडपीठाने सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करीत भय्यालाल यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केल्याने हा खटला प्रलंबित आहे.
या घटनेनंतर सरकारने भैयालाल भोतमांगे यांना सुरक्षा पुरवली होती. तसंच, त्यांना भंडारा येथे म्हाडाचे पक्के घर दिले होते व वसतिगृहात नोकरीदेखील देऊ केली होती. भोतमांगे परिवारातील बचावलेले कुटुंबप्रमुख भय्यालाल भोतमांगे यांचे २०१७ साली निधन झाले.