शाळकरी मुलीसोबत गावातल्या तरुणाचे भयंकर कृत्य,दमदाटी करत …

बीड : अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जाताना तिचा रस्ता अडवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मनोज तांदळे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वडवणी तालुक्यातील एका गावात राहते. आरोपी मनोज तांदळे देखील याच गावात राहतो. घटनेच्या दिवशी १४ फेब्रुवारीला पीडित मुलगी नेहमी प्रमाणे शाळेत गेली होती. शाळा सुटल्यानंतर ती एकटी पुन्हा घरी निघाली होती.
दरम्यान, घरी जात असताना आरोपी मनोजने तिचा रस्ता अडवला. तिच्याशी दमदाटी करत तिचा हात पकडला आणि तिला ओढत घरात घेऊन गेला. याठिकाणी आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केला. यावेळी पीडित मुलीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
या घटनेनंतर पीडित मुलीने घडलेला सगळा प्रकार आपल्या आजीला आणि आईला सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी पीडित मुलीसह पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.