‘भारताला आम्ही 182 कोटी रूपये का द्यायचे? त्यांच्याजवळ आधीपासून …

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे दुसऱ्यांदा हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. ‘अमेरिका फर्ट’ म्हणजेच आपल्या देशाला प्राधान्य देण्याचे धोरण हे त्यामागील सूत्र आहे.
त्यानुसार ट्रम्प यांनी सरकारी कार्यक्षमता विभाग ( DOGE ) सुरू केला आहे. या DOGE मंत्रालयाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी विविध देशांना दिला जात असलेला निधी रोखला आहे. त्यात भारताला देण्यात येत असलेल्या 21 दशलक्ष अमेरिकी डॉलर ( 182 कोटी रूपये ) निधीचाही समावेश आहे.
हा निधी रोखल्यानंतर आता राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे. ‘आम्ही भारताला 182 कोटी रूपये का देत आहोत? त्यांच्याजवळ पहिल्यापासून खूप पैसा आहे. भारत हा जगात सर्वात जास्त कर लावणारा देश आहे,’ अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे.
निवडणूक आणि राजकीय प्रक्रिया भक्कम करण्यासाठी अनेक देशांना अमेरिकेकडून निधी पुरवला जात होता. पण, DOGE चे प्रमुख इलॉन मस्क यांनी 16 फेब्रुवारीला हा निधी बंद करण्याचा निर्णय घेतला.
त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय दौऱ्याचा उल्लेख करताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प प्रसारमाध्यमांना बोलताना म्हणाले, “आम्ही भारताला 181 कोटी रूपये का देत आहोत? भारताजवळ आधीपासूनच खूप पैसा आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त कर आकारणारा देश आहे. तिथे आम्हाला मोठ्या प्रयत्नाने प्रवेश करावा लागतो. कारण, त्यांचे आयातशुक्ल खूप जास्त आहे.”
“मला भारत आणि त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खूप सन्मान आहे. पण, तेथील मतदार वाढण्यासाठी आम्ही 182 कोटी रूपये का द्यायचे?” असा सवाल ट्रम्प यांनी उपस्थित केला आहे.