भांडून प्रेमविवाह केला, दीड वर्षात मन भरलं, अहिल्यानगरमध्ये विवाहितेचा केला भयंकर अंत
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2025/02/IMG_20250213_174403-780x470.jpg)
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं सासरच्या मंडळींनी एका विवाहित महिलेचा भयावह अंत केला आहे.
संबंधित महिला मंगळवारी दुपारी स्वयंपाक करत असताना नवऱ्यासह सासरच्यांनी तिला जाळून मारलं आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
किर्ती धनवे असं हत्या झालेल्या 22 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. ती ठाण्याजवळील उल्हासनगर येथील रहिवासी होती. दीड वर्षांपूर्वी तिने अहिल्यानगर जिल्ह्यातील वडगाव येथील रहिवासी असणाऱ्या अनिकेत धनवे नावाच्या तरुणासोबत विवाह केला. दोघांच्या लग्नाला घरच्यांनी विरोध केला होता. तरीही दोघांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न केलं. दोघांच्या प्रेम विवाहाला दीड वर्षेही पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आरोपी अनिकेतचं किर्तीवरील प्रेम कमी झालं. त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांशी मिळून किर्तीला जाळून मारल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीड वर्षापूर्वी वडगाव येथील अनिकेत धनवे आणि उल्हासनगर येथे राहणारी किर्ती धनवे यांचा प्रेमविवाह झाला होता. अनिकेत आणि किर्ती यांचे लग्नाच्या पूर्वीपासूनजवळचे नातेसंबंध होते. प्रेमविवाह केल्यानंतर त्यांचे रितसर लग्न लावून दिले. मात्र विवाहितेच्या सासरच्यांनी तिला सून मान्य केलं नव्हतं. तिला सासरच्यांकडून सातत्याने जाच सुरू होता. याच कारणातून सासरच्या लोकांनी किर्तीला जाळून मारलं आहे.
मंगळवारी दुपारी किर्ती शेतातील छप्परामध्ये स्वयंपाक करीत होती, याचवेळी सासरच्यांनी तिला जाळून ठार मारलं. याप्रकरणी नवरा अनिकेत अंकुश धनवे, सासू करुणा अंकुश धनवे, सासरे अंकुश होनाजी धनवे यांनी त्यांचे इतर साथिदाराचा मदतीने जाळून हत्या केली असल्याची फिर्याद विवाहितेचे वडील संतोष विठ्ठल अंग्रख यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत.