धार्मिक

महाकुंभच्या वाटेत चेंगराचेंगरीसारखी स्थिती, लाखो भाविक 12 तासांपासून अडकून पडले; 25 किलोमीटरपर्यंत रांगा; संगम स्टेशन बंद केले


वीकेण्डच्या सुट्टीमुळे देशभरातील भाविक महाकुंभसाठी दाखल झाल्याने आज प्रयागराजमध्ये भाविकांचा अक्षरशः महासागर उसळला. प्रयागराजच्या दिशेने जाणारे रस्ते जाम झाले आणि लाखो भाविक 12 तासांहून अधिक काळ अडकून पडले.

 

तब्बल 25 किलोमीटरपर्यंत गाडय़ांच्या रांगा लागल्याने आणि तासन्तास गाडीत बसून राहावे लागल्याने भाविकांचे अन्नपाण्यावाचून प्रचंड हाल झाले.

वाराणसी, लखनऊ, कानपूर आणि रीवा येथून प्रयागराजच्या दिशेने जाणाऱया रस्त्यांवर केवळ वाहनेच वाहने दिसत होती. भाविकांची प्रचंड गर्दी उसळण्याच्या शक्यताने प्रयागराज जंक्शनवर गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आपत्कालीन गर्दी व्यवस्थापन लागू करावे लागले. प्रयागराजमधील संगम स्टेशन्स बंद करावी लागली. त्यामुळे अनेक भाविकांना लखनौला परतावे लागले.

 

किन्नर जगद्गुरू हिमांगी सखी यांच्यावर जीवघेणा हल्ला

महापुंभात किन्नर जगद्गुरू हिमांगी सखी या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झाल्या. ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर होण्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हल्लेखोर फॉर्च्युनर गाडीतून आले होते. हल्ल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी 50 लोकांना घेऊन आमच्या शिबिरात घुसून काठीने, हॉकी स्टीक आणि रॉडने मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

भाविकांचा कोंडमारा

प्रयागराजमध्ये करोडो भाविक दाखल झाल्यामुळे संगमतटाकडे जाणारे रस्ते भाविकांनी खचाखच भरून गेले. अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नसल्याने अनेकांचा श्वास गर्दीत कोंडला.

वाराणसी स्थानकात गर्दी; मोटरमनच्या डब्यात शिरले प्रवासी

महाकुंभमेळ्यासाठी जगभरातील भाविक प्रयागराजला पोचत आहेत. त्यामुळे वाराणसी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी आहे. महाकुंभ स्पेशल ट्रेनमध्ये चढण्यासाठी शनिवारी रात्री मोठी गर्दी उसळली. काही प्रवाशांनी तर इंजिन डबाच ताब्यात घेतला. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास प्रयागराजला जाणारी स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आली. ट्रेनमध्ये आधीच गर्दी होती. प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना आत चढायला मिळाले नाही.

 

बस पलटी झाल्याने 12 भाविक जखमी

महाकुंभहून मध्य प्रदेशला जाणारी भाविकांनी खचाखच भरलेली बस पलटी झाली. या दुर्घटनेत 12 भाविक जखमी झाले. तर सेक्टर-19 मध्ये आग लागल्याने एक कल्पवासी तंबू जळून खाक झाला. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

10 किलोमीटरसाठी दहा तास

वाराणसी ते प्रयागराज महामार्गावर जागोजागी बॅरिकेड्स लावण्यात आले होते, तर तब्बल 50 हजार वाहने अडकून पडली होती. अधूनमधून वाहनांना पुढे सरकू दिले जात होते, परंतु केवळ 5 ते 10 किलोमीटर जाण्यासाठी तब्बल 10 तास खर्ची पडत होते. तर लखनऊ, प्रतापगड आणि प्रयागराज महामार्गावर वाहनांच्या 30 किलोमीटर लांब रांगा लागल्या. 15 तास उलटूनही भाविक महाकुंभाच्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button