रामदेव बाबाविरोधात अजामीनपात्र वॉरंट, बालकृष्ण यांच्यावरही कारवाई
योगगुरु बाबा रामदेव यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. केरळमधील एका न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. रामदेव बाबांसोबत पतंजलि योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधातही वॉरंट जारी करण्यात आलंय.
पलक्कड जिल्हा कोर्टाने दोघांविरोधात हे वॉरंट जारी केलं असून सुनावणीला उपस्थित न राहिल्यानं कारवाई करण्यात आलीय. केरळच्या ड्रग्ज इन्स्पेक्टरने दिव्य फार्मसीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.
न्यायालयाने दोघांनाही १५ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय. याआधी दोघांना कोर्टाने १ फेब्रुवारीला जामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. मात्र तरीही दोघे न्यायालयात हजर झाले नाही. दिव्य फार्मसीकडून संभ्रम निर्माण करणाऱ्या जाहिराती प्रसारीत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी केरळ ड्रग्ज इन्स्पेक्टरने कारवाई केलीय.
योगगुरु बाबा रामदेव आणि पतंजलि आयुर्वेद लिमिटेडवर अनेक गुन्हे दाखल आहेत. यात खोट्या जाहिराती, अवमान, ट्रेडमार्क उल्लंघन यांचा समावेश आहे. या प्रकऱणी सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबा आणि पतंजलिला दिलासा दिला आहे. मात्र न्यायालयाने इशारा दिला होता की, जर पुन्हा न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलं तर शिक्षा होऊ शकते.
पंतजलिच्या खोट्या जाहिराती प्रकऱणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजलि आय़ुर्वेद लिमिटेडचा माफीनामा स्वीकारला होता. या प्रकरणातील अब्रुनुकसानीचं प्रकऱण बंद करण्यात आलं होतं. पण पतंजलिच्या कापराच्या उत्पादन विक्रीवर बंदी घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने पतंजलिवर चार कोटी रुपयांचा दंड केला होता. कोरोना बरा करण्याचा दावा, मॉडर्न मेडिसिनला बेकार म्हणल्या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशननं बाबा रामदेव यांच्यावर आरोप केले होते.