डोक्यात अन् चेहऱ्यावर सपासप वार, शाळेसमोरच विद्यार्थ्याचा खून, रक्तरंजित घटनेनं पुणे हादरलं!
पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे याठिकाणी एका विद्यार्थ्यीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणातून झालेल्या वादातून चार जणांनी रक्तरंजित बदला घेतला आहे.
आरोपी विद्यार्थ्यांनी धारदार शस्त्र आणि कोयत्याने पीडित विद्यार्थ्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका भयंकर होता की विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. शाळेसमोरच विद्यार्थ्याची हत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आर्यन शंकर बेडेकर असं हल्ला झालेल्या 19 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. तो तळेगाव रेल्वे स्टेशन परिसरातील सिद्धार्थनगरमध्ये वास्तव्याला राहतो. आर्यनचे ओळखीचे असलेले शिवराज कोळी, संतोष कोळी, आशिष लोखंडे आणि पोळ्या लोखंडे यांनीच हा हल्ला केल्याचा संशय आर्यनच्या कुटुंबीयांना आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मृत आर्यनचा आरोपींसोबत किरकोळ कारणातून वाद झाला होता. याच वादाचा बदला आरोपींनी घेतला आहे. शुक्रवारी दुपारी आर्यन बेडेकर हा तळेगाव दाभाडे येथील सरस्वती विद्यालयासमोर उभा होता. यावेळी अचानक आलेल्या आरोपींनी आर्यनवर कोयता आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. आरोपींनी आर्यनच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर घाव घातले. यामुळे आर्यनचा जागीच मृत्यू झाला.
हा हल्ला झाल्यानंतर सर्व संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी तातडीने आर्यनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांना आता हल्लेखोरांची माहिती मिळाली असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. किरकोळ वादातून एका 19 वर्षीय विद्यार्थ्याची अशाप्रकारे हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.