आईने रचला भयानक कट, प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाला दगडाने ठेचलं …
आईनेच प्रियकराच्या मदतीने तरुण मुलाच्या खुनाचा कट रचल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. प्रियकराने दोन साथीदारांच्या मदतीने दगडाने ठेचून मुलाची हत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित तरुणाचा जीव वाचला असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
कराड तालुक्यातील वराडे येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणातील आरोपी आई आणि तिचा प्रियकर पुण्याच्या हवेली तालुक्याचे रहिवासी आहेत.
प्रशांत शेंडगे या 24 वर्षांच्या तरुणाची आई शोभा महादेव शेंडगे हिचे जयेंद्र गोरख जावळे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या अनैतिक संबंधांना प्रशांत वारंवार विरोध करत होता, त्यामुळे आई शोभाने तिचा प्रियकर जयेंद्र जावळे याच्या मदतीने प्रशांतचा खून करण्याचा कट रचला.
दारू पाजून मुलावर हल्ला
जयेंद्र जावळे याने त्याचे साथीदार सिद्धार्थ व्हावळे आणि अकबर शेख या दोघांना मदतीला घेऊन प्रशांतला रिक्षाने उंब्रजमधून वराडे येथील शेतात आणलं, त्याठिकाणी त्यांनी प्रशांतला दारू पाजली. तसंच दगडाने ठेचून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रशांतला जखमी अवस्थेमध्ये सोडून ते तिथून पसार झाले. पोलिसांनी प्रशांतला रुग्णालयात दाखल केले आणि तपासाला सुरूवात केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वराडे गावाच्या हद्दीत सागवानच्या शेतामध्ये बुधवारी रात्री प्रशांत शेंडगे हा युवक जखमी अवस्थेत आढळला होता, त्यानंतर त्याला पोलिसांनी रुग्णालयात नेलं. सध्या प्रशांत याच्यावर उपचार सुरू आहेत.
शोभा महादेव शेंडगे (वय 38, रा. काटेपुरम चौक, पिंपळे गुरव, सांगवी, ता. हवेली, जि. पुणे) जयेंद्र गोरख जावळे (वय 40, रा. सांगवी, ता. हवेली. जि. पुणे) सिद्धार्थ विलास वाव्हळे (वय 25, रा. मातोश्रीनगर, वांगी रोड, परभणी), अकबर मेहबूब शेख (वय 25, रा. निकाळजे वस्ती, बाणेरगाव, बालेवाडी स्टेडियमजवळ, ता. हवेली) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. तर खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या प्रशांत महादेव शेंडगे (वय 24, मुळ रा. शिवडे, ता. कराड) याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.