दृष्यम पेक्षाही भयानक; अशोक धोडींची हत्या, मृतदेहासह कार दगड खाणीत सापडली

शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांची लाल रंगाची ब्रिझा कार सापडली आहे. या कारच्या डिक्कीमध्ये एक मृतदेहदेखील सापडला आहे. हा मृतदेह अशोक धोडी यांचा असल्याचं समोर आलं आहे.
गोताखोरांनी पाण्यातून गाडी बाहेर काढली. तेव्हा गाडीत एक काळ्या रंगाचं जॅकेट आणि पांढऱ्या रंगाचे मोबाईल इयरफोनही बाहेर काढले.
गुजरातमधील भिलाड जवळील सरिग्राम मालफलिया येथे एका बंद दगड खाणीत अशोक धोडी यांची लाल रंगाची कार सापडली. यानंतर पालघर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. यानंतर अशोक धोडी यांची गाडी पाण्यातून बाहेर काढण्यात आली. तेव्हा गाडीच्या डिक्कीमध्ये अशोक धोडी यांचा मृतदेह आढळून आला.
20 जानेवारीपासून धोडी बेपत्ता
शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अशोक धोडी 20 जानेवारीपासून बेपत्ता झाले होते. अशोक धोडी यांच्यासोबत नेमकं काय झालं? याचा काहीच थांगपत्ता पोलिसांना मागील १२ दिवसांपासून लागत नव्हता. आता अखेर पोलिसांनी या अशोक धोडी यांच्या बेपत्ता होण्याचं गूढ उलगडलं आहे. अशोक धोडी यांचे सख्खे बंधू अविनाश धोडी यांनीच धोडी यांची अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दारु तस्करीत अडसर ठरत असल्याच्या कारणातून अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या केल्याची माहिती समजत आहे.
पोलीसांनी अटक केलेल्या आरोपींनी याबाबतची कबुली दिल्याचं सांगितलं जातंय. मात्र पोलिसांकडून अद्याप याला अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. अशोक धोडी अपहरण प्रकरणी पोलिसांनी अलीकडेच विशाल गोरात, रवींद्र मोरगा, सतीश दुमाडा आणि संतोष धिंडे यांना अटक केली होती. चौघांना स्थानिक न्यायालयात हजर केलं असता, त्यांना सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. या चारही आरोपींचा धोडी यांच्या अपहरण प्रकरणात सहभाग असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार दुसरा तिसरा कुणी नसून अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडी असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी अविनाश धोडी यालाही ताब्यात घेतलं होतं. मात्र तो पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यास यशस्वी ठरला आहे. आरोपी अविनाश धोडी हा दमणवरून दारू आणू महाराष्ट्रात विकायचा. भावाच्या दारु तस्करीत अशोक धोडी अडसर ठरत होते. एकनाथ शिंदे गटात काम करताना अशोक धोडी यांनी महाराष्ट्र गुजरात सीमावादावर आक्रमक भूमिका घेतली होती. या सीमेवरून होणाऱ्या अवैध तस्करीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. यातूनच त्यांचं भावासोबत वैमनस्य निर्माण झालं होतं.
वर्षभरापूर्वी अशोक धोडी यांनी अविनाशच्या दारुच्या गाडीचा पाठलाग केला होता. यावेळी अविनाशने अशोक धोडी यांच्या गाडीला धडक देऊन त्यांना वासा माच्छी पाडा येथील पुलावरून खाली पाडण्याचा देखील प्रयत्न केला होता. या हल्ल्यातून अशोक धोडी बचावले होते. मात्र २० जानेवारीला याच वादातून त्यांचं अपहरण करण्यात आल्याचा आरोप होत आहे.