कोथरूडमध्ये भरदिवसा तरूणाचा मानेवर व हातावर वार करून निर्घृण खून …
पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता कोथरूड भागातील शास्त्रीनगर येथे सागर कॉलनी परिसरात तरूणाचा चार अल्पवयीन मुलांनी पालघन सारख्या धारदार हत्यारांनी डोक्यात तसेच मानेवर व हातावर वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.
भरदिवसा घटना घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आशिष दशरत जाधव (वय ३५) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष जाधव महापालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरी करत होता. तर यातील एका अल्पवयीन मुलाची आई व आशिषची कामावर ओळख झाली होती. ओळखीनंतर त्यांच्यात मैत्री पूर्ण संबंध तयार झाले होते. दरम्यान आशिषने संबंधित महिलेला हात उसने पैसे देखील दिले होते. कालांतराने त्यांच्यात वादविवाद सुरू झाले. आशिष पैसेही परत मागत होता. त्यावरून तो शिवीगाळ करत असत.
दरम्यान गुरुवारी देखील त्यांच्यात वाद झाले होते. तेव्हा महिलेचा अल्पवयीन मुलगा देखील समोर होता. त्याने हा प्रकार पाहिला, त्यामुळे त्याला आशिषचा राग आला. सायंकाळी आशिष हा शास्त्रीनगर येथील सागर कॉलनी येथे आला होता. तो पार्क केलेल्या दुचाकीवर बसलेला होता. दरम्यान चार ते पाचजण हत्यारे घेऊन आले. त्यांनी बेसावध असताना त्याच्यावर धारदार हत्यारांनी वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिषला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना आशिषचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. दरम्यान याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे समजते.