NASA चं नवं संशोधन,एलियन्स पृथ्वीवरच असून, ते दुसरं-तिसरं कोणी नसून …
एलियन्स अर्थात परग्रहवासी हा कायमच माणसाच्या कुतुहलाचा विषय राहिला आहे. पृथ्वीप्रमाणेच ब्रह्मांडातल्या अन्य ग्रहांवर जीवसृष्टी असेल का, असलीच तर ते जीव मानवासारखे असतील का, ते आपल्याला शोधत इथे येतील का, असे अनेक प्रश्न साहित्यिकांपासून शास्त्रज्ञांपर्यंत सर्वांनाच पडत असतात.
त्यामुळे त्यांची उत्तरं शोधण्यासाठी संशोधन केलं जातं. नवनव्या संशोधनातून नवनवी माहिती हाती येत असते. आता अमेरिकेतल्या ‘नासा’ या संस्थेने केलेल्या नव्या संशोधनातून अशी माहिती पुढे आली आहे, की सर्व जण थक्क झाले आहेत. एलियन्स पृथ्वीवरच असून, ते दुसरं-तिसरं कोणी नसून मानवच आहेत, असा निष्कर्ष त्यात काढण्यात आला आहे.
24 सप्टेंबर 2023 रोजी बेन्नू लघुग्रहावरून परतलेल्या नासाच्या ओसायरिस रेक्स यानाच्या सँपल रिसर्चवरून असं कळलं, की त्यात जीवनासाठी आवश्यक घटक आहेत. त्यात डीएनए आणि आरएनएचे 5 न्यूक्लिओबेसेस आणि प्रोटीनमध्ये मिळणाऱ्या 20 अमिनो अॅसिड्सपैकी 14 अॅसिड्स सापडली आहेत. पृथ्वीवर असलेली जीवसृष्टी एखाद्या अॅस्टरॉइडवरून आली आहे का, असा सवाल यातून उपस्थित झाला आहे. म्हणजे माणूसचा असा एलियन आहे, की ज्याचं मूलस्थान पृथ्वी नाही, तर तो बाहेरून आला असावा, असं यातून ध्वनित होत आहे.
ओरिजिन्स स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन रिसोर्स आयडेंटिफिकेशन अँड सिक्युरिटी रिगोलिथ एक्स्प्लोअरर असं ओसायरिस रेक्सचं पूर्ण नाव आहे. लघुग्रहावरचं सॅम्पल आणण्याची ही अमेरिकेची पहिलीच मोहीम होती. या यानाने तीन वर्षांपूर्वी बेन्नूवरून सँपल गोळा केलं होतं. तेव्हापासून हे यान पृथ्वीकडे येत होतं. 45 किलो वजनाच्या कॅप्सूलमधून 250 ग्रॅम सॅम्पल आणण्यात आलं होतं.
अॅस्टरॉइड म्हणजे लघुग्रह. ते छोट्या खडकांप्रमाणे असतात आणि सूर्याभोवती फिरत असतात. त्यांना वातावरण नसतं. त्यांचा आकार 1000 किलोमीटर्सपर्यंत असू शकतो. कधी ना कधी हे लघुग्रह पृथ्वीवर पडत असतात.
नासाच्या यानाने जो मातीचा नमुना आणला आहे, तो जगासाठी खूप उपयुक्त आहे. 1650 फीट रुंदीच्या लघुग्रहावरचं सॅम्पल नासाच्या या यानाने पाठवलं. या सॅम्पलचा पहिला रिपोर्ट जाहीर झाला आहे. या संशोधनावरचा लेख नासाचे अॅस्ट्रोबायॉलॉजिस्ट डॅनियल जेल्विन यांनी नेचर अॅस्ट्रॉनॉमीमध्ये लिहिला आहे. यात जीवसृष्टीसाठी आवश्यक मूलभूत घटक असून, मूळ लघुग्रहावर किती मोठ्या प्रमाणावर ते असतील, याचा अंदाज यातून बांधता येईल.
बेन्नू हा लघुग्रह 24 सप्टेंबर 2182मध्ये पृथ्वीला धडकू शकतो, असा अंदाज आहे. त्यामुळे 22 अणुस्फोटांएवढा विध्वंस होईल आणि त्यामुळे पृथ्वीवरचं जीवन संपुष्टात येऊ शकतं. या लघुग्रहाची दिशा कशी बदलता येऊ शकेल किंवा आणखी काय करता येऊ शकेल, तो किती मजबूत आहे, हे कळण्यासाठी नासाने त्यावरून सॅम्पल मागवलं होतं.