‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चा विदर्भात प्रवेश; नागपुरात आढळले सहा रुग्ण, दोघांची प्रकृती गंभीर
पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमनं थैमान घातलं आहे. या आजाराचे १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या आजाराने आता विदर्भातही प्रवेश केला आहे.
नागपूरमध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे सहा रुग्ण आढळून आले आहेत, ही रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे सहा रुग्ण आढळून आले आहे. यापैकी चार रुग्ण नागपूर मेडिकल कॉलेज, तर दोन रुग्ण मेयोतमध्ये दाखल आहेत. नागपूर मेडिकल कॉलेजमधील १९ वर्षीय रुग्णाला त्रास कमी असल्याने जनरल वार्डमध्ये ठेवण्यात आलं आहे.
याशिवाय आठ वर्षांच्या एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे, त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. तर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजधील ३७ वर्षीय रुग्णाची प्रकृतीही गंभीर आहे. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. इतर रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, पुण्यानंतर आता नागपूरमध्येही गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जलजन्य आजार टाळण्यासाठी आपण जी काही काळजी घेतो, तशीच काळजी घ्यावी लागेल, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच स्वयंपाकासाठी पाणी शुद्ध वापरावे, अन्न ताजे आणि गरम खावे, पाणी स्वच्छ प्यावे, बाहेरील अन्न खाणं टाळावं, अशा सुचनाही आरोग्य विभागकडून देण्यात आल्या आहेत.
काय आहेत जीबीएसची लक्षणे?
गुइलेन-बॅरे सिंड्रोमची सुरुवात सामान्यतः हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे आणि कमकुवतपणाने होते. ही लक्षणे वेगाने पसरू शकतात आणि अर्धांगवायूमध्ये बदलू शकतात. जीबीएसची सुरुवातीची लक्षणे पुढील प्रमाणे असू शकतात.
हात, पाय, घोटे किंवा मनगटात मुंग्या येणे.
पायांमध्ये कमकुवतपणा.
चालण्यात अशक्तपणा, पायऱ्या चढण्यास त्रास होणे.
बोलण्यात, अन्न चावण्यात किंवा गिळण्यात अडचण येणे.
दृष्टीदोष किंवा डोळे हलवणास अडचण होऊ शकते.
तीव्र वेदना, विशेषतः तीव्र स्नायू वेदना.
लघवी आणि आतड्यांच्या हालचालींमध्ये समस्या.
श्वास घेण्यास त्रास होणे.