पुणेकर दुकानदाराला जाहिरात भोवली,’1 रुपयांमध्ये ड्रेस घेऊन जा’,महिलांनी स्टॅच्यूवरच कपडे काढून नेले!
पुणे : पुणेकर काय शक्कल लढवतील याचा नेम नाही. आज प्रजासत्ताक दिनी पुण्यातील एका दुकानदाराने 1 रुपयांमध्ये महिलांना ड्रेस देणार अशी घोषणा केली. शहर भरात पोस्टर्सही वाटले.
मग काय आज सकाळपासून बायकांनी १ रुपया घेऊन दुकानात तुफान गर्दी केली. पण गर्दी पाहून पुणेकराने दुकान बंद करून पसार झाला. त्यामुळे पुणेकर महिलांनी दुकान फोडण्याची धमकीच दिली.
त्याचं झालं असं की, राजगुरूनगर शहरातील वाडा रोडवरील एका होलसेल साडी दुकानदाराने दुकानाची जाहिरात व्हावी. या उद्देशाने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर दुपारी 3.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेसाठी एक रुपयात ड्रेस देण्याची योजना जाहीर केली होती. या योजनेत वाटण्यासाठी त्याने मर्यादित संख्येत ड्रेसही आणले होते. आता एक रुपयात ड्रेस मिळणार या योजनेची मोठ्या प्रमाणत तोंडी प्रसिद्धी झाल्यानं दुकानदाराच्या अपेक्षेपेक्षा काही पट जास्त महिलांनी दुकानापुढे गर्दी केली.
दुकानदाराने ठरल्याप्रमाणे ३ वाजता एक रुपयात ड्रेस देण्यास सुरवात केली खरी पण दुकानदाराने योजनेत वाटण्यासाठी आणलेल्या ड्रेसच्या तुलनेत कितीतरी जास्त संख्येनं महिलांची झालेली गर्दी पाहून दुकानदार हतबल झाला. त्यामुळे दुकानदाराने काही वेळात दुकानच बंद केलं.
आता दुकानदाराने दुकान बंद केल्यानं एक रुपयात ड्रेस खरेदीच्या उद्देशाने दुकानाबाहेर गर्दी केलेल्या महिला आक्रमक झाल्या. महिलांनी अक्षरशः दुकानाच्या बाहेर असणाऱ्या स्टॅच्यू वरील सॅम्पलचे कपडे काढून घेतले. दुकान उघडत नाही हे पाहून महिलांनी दुकानासमोरच राजगुरूनगर वाडा भीमाशंकर रोड अडवला. एवढंच नाहीतर महिलांनी दुकान फोडून कपडे घेऊन जाऊ, असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे अखेर पोलिसांना बोलावण्यात आलं. रस्त्यावर झालेली महिलांची गर्दी व महिलांना रस्ता अडवल्याचे कळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेरीस संध्याकाळी काही प्रमाणात गर्दी कमी झाली. पण अनेक महिला १ रुपयांमध्ये ड्रेस न घेताच माघारी परतल्या. महिला माघारी परतल्यानंतर दुकान मालकाचा जीव भांड्यात पडला.