बीडमध्ये ध्वजारोहणावेळी राडा, दत्ता भरणेंचा ताफा अडवून आत्मदहनाचा प्रयत्न …
बीड : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून बीड येथे दत्ता भरणे यांनी ध्वजारोहण करून मानवंदना स्वीकारली. परंतु या कार्यक्रमाला आंदोलकांमुळे गालबोट लागले.
मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्याच्या समोर एका तरुणाने डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
बीडमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयावरील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आमदार संदिप क्षीरसागर यांच्यासह जिल्हाधिकारी अविनाश पाठक , पोलीस अधीक्षक नवनीत कावत,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांच्यासह जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी राज्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे असल्याची ग्वाही देत शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे भरणे म्हणाले.
ध्वजारोहणावेळी राडा, भरणेंचा ताफा अडवून आत्मदहनाचा प्रयत्न
बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांना बडतर्फ करा या मागणीसाठी एक तरुण चांगलाच आक्रमक झाला होता. नितीन मुजमुले नावाच्या तरुणाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्याला आडवे जात नितीन मुजमुले नावाच्या तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.