फडणवीसांनंतर जरांगे पाटलांच्या रडावर आता भाजपचा हा बडा नेता, दिला थेट इशारा
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पहिला दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली.
मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यासाठी ते आता पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. दरम्यान त्यांनी आपल्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
सरकार भावना समजून घ्यायला तयार नाही, तुमचा राजकीय विरोध असेल किंवा मतभेद असतील, पण गरीबांशी सूड भावनेने का वागता असा सवाल यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी नाही, शिंदे समितीचे कामही बंद करून टाकले ही कोणती पद्धत आहे, ही वागणूक चांगली नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठ्याशिवाय या राज्यात कोणाचे पान हालत नाही, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, आमची ही हक्काची लढाई आहे, आता फडवणीस यांनी बेईमानी करू नये, आमच्या मागण्या मान्य कराव्यात. आमची वर्चस्वाची लढाई नाही, आमचे समाजासाठी प्रामाणिक काम सुरू आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील इशारा दिला आहे. समाधान न व्हायला तुम्ही काय केले, फालतू बोलायचं नाही, आम्ही तुम्हाला सन्मानाने बोलतो, वाकड्यात शिरायचं नाही. तसा शहाणपणा इकडे नाही शिकवायचा, माजुरड्या सारखं बोलायचं नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शिंदे साहेब होते त्यावेळी आरक्षण दिले, आम्ही नाही म्हणत नाही, पण ते सहजा सहजी आम्हाला मिळालं नाही. आम्हाला लढावं लागलं. लाखोंच्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावर होता. त्यामुळे आता सरसकट कुणबी प्रमाणपत्रासह आमच्या आठ -नऊ मागण्या मान्य करून टाकाव्यात असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.