तुर्कीतील स्की रिसॉर्ट हॉटेलला भीषण आग! ७६ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी
तुर्कीमधील एका हॉटेलला मंगळवारी (दि.२१) भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत जवळपास ७६ जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. बोलू प्रांतातील कार्तलकाया स्की रिसॉर्टमधील हॉटेलमध्ये पहाटे साडे तीनच्या सुमारास ही आग लागली.
दरम्यान, जखमी झालेल्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, बचाव पथके आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी मिळून जवळपास २३० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तसेच, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, परंतु आग लागली तेव्हा हॉटेल धुराने वेढले गेले होते, असे बोलू प्रांताचे गव्हर्नर अब्दुलअझीझ आयडिन यांनी सांगितले.
आग लागल्याची घटना घडल्यानंतर अनेक लोकांनी घाबरून हॉटेलच्या इमारतीवरून उड्या मारल्या. त्यामुळे काहींचा मृत्यू झाल्याचेही येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. तर तुर्कीचे न्यायमंत्री यिलमाझ टुंक यांनी सांगितले की, बोलू प्रांताच्या मुख्य सरकारी वकील कार्यालयाने आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी सुरू केली आहे. या चौकशीसाठी सहा सरकारी वकील आणि पाच तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान, कार्तलकाया रिसॉर्ट हे तुर्कीमधील प्रमुख हिवाळी पर्यटन स्थळांपैकी एक आहे. जे स्की हंगामात हजारो पर्यटकांना आकर्षित करते. १९७८ पासून हे हॉटेल तुर्की स्कीअर्ससाठी एक प्रमुख केंद्र आहे. बोलू हे शहर तुर्कीच्या वायव्य भागात असून अंकारापासून ते जवळपास १७० किलोमीटर (१०५ मैल) अंतरावर आहे.