महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत! 20 आमदार सामंतांसोबत…, राऊतांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात आणखी एका नव्या राजकीय भूकंपाचे संकेत मविआच्या नेत्यांच्या वक्तव्यातून मिळाले आहेत. ‘एकनाथ शिंदेंना संपवून उद्या नवा ‘उदय’ पुढे येईल’ असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं.
उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं, ‘एकनाथ शिंदे, अजित पवारांना दूर करण्याचे प्रयत्न’ असं म्हणत वडेट्टीवारांनी भाजपवर गंभीर आरोप केला. भाजपला राज्यात एकहाती सत्ता पाहिजे असं म्हणताना त्यांनी याची सुरुवात ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून’ होणार असल्याचं म्हणत राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं.
भाजपच्या याच भूमिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते संजय राऊत यांनीसुद्धा स्पष्ट प्रतिक्रिया देत राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाकुंभ मेळ्यात जावं असा खोचक टोला त्यांनी लगावत, एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा ‘उदय’ समोर येईल असं स्पष्ट वक्तव्य केलं. उदय सामंत यांच्या डावोस दौऱ्यावरही राऊतांनी निशाणा साधला.
काय म्हणाले राऊत?
‘एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा ‘उदय’ समोर येईल. माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत. ही माहिती माझी… 20 आमदार जेव्हा एकनाथ शिंदे सरकार स्थापन करताना रुसले होते तेव्हाच हा ‘उदय’ होणार होता किंबहुना तेव्हाच हा ‘उदय’ करण्याचं निश्चित झालं होतं. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ सव्वालाखाची… हे महाराष्ट्रातील सगळे पक्ष फोडतील. शिंदे गटही फोडतील, अजित पवार गटही फोडतील. फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आणि राजकारण आहे’, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.