पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांचा तुरूंगवास
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan)यांना अल-कादिर ट्रस्टच्या जमीन भ्रष्टाचार प्रकरणात 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
इम्रान खान यांच्यासह त्यांच्या पत्नी बुशरा बीबी (Bushara Biwi) यांनाही दोषी ठरवण्यात आलेस असून, त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, असे वृत्त पाकिस्तानच्या डॉन न्यूजने दिले आहे. यासोबतच न्यायालयाने इम्नान यांना 10 लाख तर, त्यांची बुशरा खान यांना 5 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
पाकिस्तानच्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) डिसेंबर 2023 मध्ये इम्रान खान, बुशरा बीबी आणि इतर सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. यामध्ये त्यांच्यावर देशाच्या तिजोरीचे 190 दशलक्ष पौंड (50 अब्ज पाकिस्तानी रुपये) नुकसान केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर याच प्रकरणात न्यायालयाने इम्रान खान यांना 14 वर्षांची तर, त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर लगेचच बुशरा बीबी यांना अटक करण्यात आली असून, इम्रान खान आधीपासूनच तुरूंगात आहेत.
याआधी इस्लामाबादच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने निकाल देण्यासाठी 17 जानेवारी ही तारीख निश्चित केली होती. स्थानिक मीडियाच्या बातम्यांनुसार, न्यायमूर्ती नासिर जावेद राणा यांनी गेल्या वर्षी 18 डिसेंबर रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण केली होती, तर त्यांनी निकाल देण्यासाठी 23 डिसेंबरची तारीख राखून ठेवली होती. नंतर त्यांनी निकाल जाहीर करण्यासाठी 6 जानेवारी ही तारीख निश्चित केली होती. मात्र, न्यायमूर्ती राणा 6 जानेवारी रोजी रजेवर होते, त्यामुळे निर्णय 13 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर आज अखेर यावर निकाल देण्यात आला आहे.