राजकीय हालचालींना वेग, काँग्रेसला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. 101 जागा लढवून काँग्रेसला केवळ १६ जागा जिंकता आल्या.
या पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली. पण वरिष्ठांकडून त्यांना पदावर कायम राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या घडामोडीनंतर आता काँग्रेस पक्षांतर्गत राजकीय हालचालींना वेग आला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वरिष्ठांकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती आहे. या अनुषंगाने आता पृथ्वीराज चव्हाण दिल्लीला देखील रवाना झाले आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल झाल्याचं दिसू शकतं, अशी माहिती आहे.
काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातील होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पुढील दोन ते तीन दिवसात काँग्रेसची दिल्लीत याबाबतची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष पद हे पश्चिम महाराष्ट्रात मिळणार असून वरिष्ठांकडून सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तत्काळ बोलावलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती आहे. पण पक्षातील तरुण चेहऱ्यांना नेतृत्वाची संधी द्यावी, अशी भूमिका चव्हाणांनी घेतली आहे. यासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांना प्रदेशाध्यक्ष पद द्यावं, असं सूचवलं आहे. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आता काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.