परळीत राखेच्या टिप्परनं सरपंचाला चिरडलं, सुरेश धसांनी थेट मालकाचं नाव सांगत केला मोठा आरोप

परळीत अजूनही राखेची वाहतूक सुरू असल्याचं दिसत आहे. परळीतील सौदांना येथील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं धडक दिली आहे. यात अभिमन्य क्षीरसागर यांचा मृत्यू झाला आहे.
मात्र, परळीत राखेचे टिप्पर अजूनही सुरू आहेत. याला परळीचे पोलीस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी, कर्मचारी जबाबदार आहेत, असा आरोप करत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी टिप्परच्या मालकाचं नाव सांगितलं आहे. ते शिर्डीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
सुरेश धस म्हणाले, “बिघडर नावाचा राख माफीया आहे. त्याच्या टिप्परने रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी सरपंचाला उडवलं आहे. एवढं भयानक प्रकरण चालू असताना हे लोक राखेचा उपसा करत आहेत. त्यामुळे हे लोक किती निर्ढावलेले आहेत, यातून दिसते. याला परळीची पोलीस, थर्मल पॉवरचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत.”
हार्वेस्टर या ऊसतोड मशीनची सबसिडी मिळवून देण्यासाठी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी अनेकांना गंडा घातल्याचं समोर आलं आहे. याबद्दल बोलताना सुरेश धस यांनी म्हटलं, “एकूण पाच हजारच्या आसपास लोकांकडून यांनी प्रत्येकी 8 लाख प्रमाणे पैसे घेतले आहेत. मात्र, 141 लोकांना मशीन द्यायचे होते. आता पंढरपूर तालुक्यात गुन्हा दाखल झाला आहे. असेच गुन्हे कोल्हापूर, पुणे आणी बीडमध्ये दाखल होतील. याचे पुरावे दिले आहेत.”
“पैसे मागायला आल्यावर बीडमध्ये हॉटेलमध्ये दम देऊन बाजूला नेऊन मारहाण करून परत पाठवले आहेत. आका आणि आका यात सहभागी आहेत. हा करोडोंचा घोटाळा जनतेच्या समोर आला आहे,” असं धस यांनी सांगितलं.
“संतोष देशमुख हत्याप्रकरणातील 7 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे. आकावर सुद्धा मकोका लावण्यात यावा,” अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.