धार्मिक

तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी; सहा भाविकांचा मृत्यू, वैकुंठ प्रवेशद्वारावर भीषण दुर्घटना; दीडशेहून अधिक जखमी


आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात आज सायंकाळी वैकुंठद्वार दर्शन तिकीट काउंटरजवळ टोकण वाटपावेळी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला, तर दीडशेहून अधिक जखमी झाले असून 5 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

 

काउंटरजवळ तब्बल 4 हजारांहून अधिक भाविक रांगेत उभे होते. त्याच वेळी भाविकांना बैरागी पट्टडा पार्कमध्ये रांग लावण्यास सांगताच भाविकांमध्ये आधी रांग लावण्यासाठी चढाओढ लागली आणि चेंगराचेंगरी झाली. धावपळीत भाविक एकमेकांच्या अंगावर पडले आणि एकच गोंधळ उडाला. प्रचंड गर्दीत अनेकांचा अक्षरशः श्वास कोंडला. जिकडेतिकडे किंकाळ्या आणि आक्रोश असे चित्र होते.

 

व्हिडिओ येथे पहा !

 

चेंगचेंगरीत मल्लिका नावाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. 10 जानेवारीपासून वैकुंठद्वार दर्शनाला सुरुवात होणार असल्याने देशभरातून लाखो भाविक तिरुपती येथे आले आहेत. तिरुमाला तिरुपती देवस्थानमध्ये वैकुंठ एकादशी 2025साठी ऑनलाईन बुकिंग आणि तिकीट जारी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वैकुंठद्वार दर्शनासाठी मंदिरात भाविकांची आतापासूनच प्रचंड गर्दी उसळली आहे. तब्बल 94 काउंटरवर गुरुवारी पहाटे 5 वाजल्यापासून तिकीट देण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे गुरुवारी तिरुपती मंदिराला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

 

मुख्यमंत्र्यांकडून शोक

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. राज्याच्या गृहमंत्री वंगालापुडी अनिता यांनीही दुःख व्यक्त केले आहे. गृहमंत्र्यांनी नजीकच्या रुईया रुग्णालयातील आपत्कालीन सेवा विभागातील स्थितीवर बारीक लक्ष ठेवावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गृहमंत्री वंगालापुडी अनिता यांनी पोलीस अधीक्षक सुब्बारायडू यांच्याशी फोनवर संपर्क साधून तिरुपती मंदिरातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच भाविकांची गर्दी लक्षात घेता महिला, मुले आणि वृद्धांच्या सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आहेत.

 

मोफत तिकिटांमुळे उडाला गोंधळ

तिकीट काउंटर अचानक उघडल्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली. लोकांनी तिकीट काउंटरवर आधी पोहोचण्यासाठी धाव घेतली आणि चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. वैकुंठ एकादशीनिमित्त तिरुमाला तिरुपती देवस्थानमध्ये जवळपास 1 लाख 20 हजार तिकिटे मोफत देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आपल्याला आणि कुटुंबाला सर्वात आधी तिकीट मिळावे या आशेने लोकांनी पट्टडा पार्कच्या दिशेने धाव घेतली आणि चेंगराचेंगरी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button