कोरोनानंतर HMPV,चीनमध्येच हे व्हायरस कुठून पसरतात? यामागे काय कारण आहे? आतापर्यंत कोणकोणते व्हायरस चीनमधून पसरले आहेत
कोरोनानंतर आता चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरसने डोकं वर काढलंय. भारतातही याचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. पाच वर्षांपूर्वी चीनमधील वुहान इथं कोरोनाचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर जगभर धुमाकूळ घातलेल्या या व्हायरसमध्ये हाहाकार उडाला होता.
जगभरात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली होती. जवळपास ७१ लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आता पुन्हा एका व्हायरसमुळे चीन चर्चेत आलंय. चीनमध्येच हे व्हायरस कुठून पसरतात? यामागे काय कारण आहे? आतापर्यंत कोणकोणते व्हायरस चीनमधून पसरले आहेत याची माहिती आपण घेऊ.
कोरोनाच नव्हे तर यापेक्षाही भयंकर असे व्हायरस चीनमधून जगभरात पसरले आहेत. सर्वात विनाशकारी महासाथ प्लेगची होती. १३४३ ते १३५३ या कालावधीत आफ्रिका, आशिया आणि युरोपात हाहाकार माजवला होता. यात ७५ ते २०० मिलियन लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सहाव्या, १४ व्या आणि १९ व्या शतकातसुद्धा प्लेगच्या साथीची लाट चीनमधूनच सुरू झाली होती. तर गेल्या १०० वर्षात चीनमधून १९१८, १९५७, २००२ आणि २०१९ मध्ये महासाथीचा प्रादुर्भाव जगभरात झालाय.
एशियन फ्लू
१९५७ ते १९५९ या कालावधीतही जगाला एशियन फ्लूने वेठीस धरलं होतं. चीनमधून हा फ्लू जगात पसरला होता. फक्त दोन वर्षात जगात या फ्लूमुळे जवळपास २० लाख लोकांचा मृत्यू झाला होता. यावरून या फ्लूचा प्रादुर्भाव किती भयंकर होता याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
स्पॅनिश फ्लू
१९१८ मध्येही स्पॅनिश फ्लू आला होता. जगात पहिल्या महायुद्धाची चर्चा सुरू असताना ही महासाथ आली होती. हा फ्लू नेमका कुठून आला हे स्पष्ट नसलं तरी अनेक रिपोर्टमध्ये चीनमधूनच पसरल्याचा दावा केला गेला होता.
१९१८ ची महासाथ ही शतकातली सर्वात घातक महासाथ ठरली होती. यामुळे जगात २० मिलियन ते ५० मिलियन इतके लोक मृत्यूमुखी पडले होते. काही आकडे तर १०० मिलियन पर्यंत अंदाज वर्तवतात. अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जवळपास ५०० मिलियन लोकांना या आजाराची लागण झाली होती. तेव्हा ही संख्या लोकसंख्येच्या ३० टक्के इतकी होती. २००२ मध्येही सार्स नावाच्या महासाथीने हाहाकार माजवला होता. हा फ्लूसुद्धा चीनमधूनच आला होता.
अस्वच्छता, वाढती लोकसंख्या, पशुपालन
चीनमधूनच व्हायरस का पसरतात याचं कारण तिथली वाढती लोकसंख्या आहे. विशेषता जनावरांच्या अनेक प्रजातींसोबत त्यांचा थेट संपर्क आणि स्वच्छतेच्या समस्या यामुळे नवनवे आजार आणि व्हायरस पसरत असल्याचे दावे रिपोर्ट्समध्ये केले जातायत. इकोहेल्थ अलायन्सचे अध्यक्ष डॉक्टर पीटर दासजक यांनी दावा केला होता की, दक्षिण मध्य चीन व्हायरससाठी एक मिक्सिंग व्हेसल आहे. स्वच्छतेची कमतरता, मोठ्या प्रमाणावर पशुपालन या भागात केलं जातं. शेतकरी त्यांच्या जनावरांना वेट मार्केटमध्ये आणतात. तिथं ते सर्व प्रकारच्या परदेशी जनावरांच्या संपर्कात ते येऊ शकतात.
जनावरं मारणं, ताजं मटण आणि उपचार पद्धती
रिपोर्टमध्ये काही असेही दावे आहेत की, चीनचं सांस्कृतिक कारणही तिथं व्हायरस पसरण्यासाटी जबाबदार आहे. चीनमध्ये ताज्या मटणाचा खप सर्वाधिक आहे. तिथल्या लोकांच्या मते ताजं मटण हे फ्रोजन मटणाच्या तुलनेत जास्त चविष्ट असतं. उघड्या जागेत मटण कापणं ही तिथं सामान्य बाब आहे. यामुळे व्हायरस पसरण्याचा धोका निर्माण होतो.
चीनमधील लोकांची एक सवय आहे की कुणी आजारी असेल तर बहुतांश लोक सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने उपचार घेतात. लोकांना उपचाराच्या नावावर एक्युपंक्चर आणि जनावरांशी संबंधित उपाय सांगण्यात येतात. यामुळे मोठ्या संख्येनं जनावरं मारली जातात आणि यातून लोकांमध्ये व्हायरस पसरण्याचा धोका वाढतो.
चीनची लपवून ठेवण्याची सवय
चीन त्यांच्या चुकीची माहिती देणं, लपवून ठेवणं आणि सेन्सरशिपसाठीही ओळखला जातो. त्यांनी गोष्टी लपवून ठेवल्यानं नवे आजार वाढण्याचा आणि पसरण्याचा धोका जास्त वाढतो. कोरोना काळातही असंच बघायला मिळालं. जनावरांसोबत चीनमधील वैज्ञानिकही नवनवे प्रयोग करतात. तेही नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतात.
स्थलांतर आणि शहरीकरण
काही तज्ज्ञांनी दावा केलाय की आशिया आणि आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असलेल्या गावामधून शहरात स्थलांतर होण्यामुळेही व्हायरस पसरतात. आशिया आणि प्रशांत क्षेत्रात वेगानं शहरीकरण होत आहे. जगातील ६० टक्के लोकं जिथं राहतायत तिथंच शहरीकरण होतंय. जागतिक बँकेनुसार, २१ व्या शतकात पहिल्या दशकात पूर्व आशियात जवळपास २०० मिलियन लोक शहरी क्षेत्रात गेले. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं. यामुळे जंगलं नष्ट केली गेली आणि परिणामी परिसंस्था पूर्ण बदलली.