धनजंय मुंडेंविरोधात वक्तव्य भोवलं, मनोज जरांगे पाटलांविरोधात गुन्हा दाखल
Manoj Jarange Patil : बीडचे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. हत्येमागील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.
काल (४ जानेवारी) परभणीमध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा निघाला. या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी हजेरी लावली. मोर्चात त्यांनी उघडपणे धनंजय मुंडेंवर टीका केली. टीका करताना वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांमुळे जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे परभणीतील जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. तेव्हा जमलेल्या जमावासमोर बोलताना त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली होती. हरामखोर अवलादीचे म्हणत त्यांनी मुंडेंवर निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन बीडच्या परळी पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
मनोज जरांगे यांच्या विरोधात परळी पोलीस ठाण्यात तुकाराम बाबुराव आघाव या व्यक्तीने तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये “काल परभणी येथे आयोजित मोर्चात मनोज जरांगे पाटलांनी ‘ह्या मुंड्या फुंड्याचे नाव सुद्धा घेतले नाही, हरामखोर अवलादीचे, असे व इतर बदनामीकारक शब्द वापरले, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांची बदनामीकारक असंवैधानिक वक्तव्य करुन बदनामी केली’ त्या भाषणाचे व्हिडीओ व्हायरल केले, त्यामुळे माझी त्यांच्या विरोधात तक्रार आहे”, असे नमूद करण्यात आले होते.
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नाव आल्याने धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. होणाऱ्या विरोधामुळे त्यांना बीडचे पालकमंत्रिपद मिळणार नाही असे म्हटले जात आहे. तसेच धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद देखील धोक्यात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे.