प्राजक्ता माळीने महिला आयोगात तक्रार करण्याचा निर्णय घेताच सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया काय?; म्हणाले
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यावरुन सध्या राजकारण तापले आहे. या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव चर्चेत आहे.
धनंजय मुंडे यांच्या जवळचे असणारे वाल्मिक कराड हे या घटनेमागचे खरे सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. त्यातच काल भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख केला होता. यावरुन प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार करणार असल्याचे बोललं जात आहे. आता यावरुन सुरेश धस यांनी युटर्न घेतला आहे.
सुरेश धस यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंवर घणाघाती आरोप केले होते. त्यांनी परळीत इव्हेंट मॅनेजमेंट कशापद्धतीने होतो याचा उल्लेख केला होता. सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल, त्यांनी परळीला यावे. त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा पसार करावा, असे विधान सुरेश धस यांनी केला होता. यावरुन वातावरण तापलं होतं. सुरेश धस यांनी केलेल्या या विधानावर प्राजक्ता माळीने आक्षेप घेतला आहे. प्राजक्ता माळी या प्रकरणी महिला आयोगात तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता याबद्दल सुरेश धस यांना विचारले असता, त्यांनी एखाद्या महिलेचा अवमान होईल असं मी बोललो नाही, असे विधान केले आहे.
“मुंडेंना कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य राहिलं नाही”
“आता भयानक इव्हेंट मॅनेजमेंट करण्याची वाल्मिक कराडांना हौस आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आले होते. शिवराज सिंह चौहान आले होते. मीही गेलो होतो. अजितदादांचा हात सटकला होता. त्यांचं सर्व सटकन होईल. रश्मिका आणि प्राजक्ता, सपना चौधरी यांची फक्त नावं घेतलं. का घेतलं. सर्व शेतकऱ्यांचे पीकं गेली. तुम्ही कृषी मंत्री, तुम्ही रश्मिका मंदानाचा कार्यक्रम घेता किती योग्य वाटतं. राजू शेट्टी साहेब आले. त्यांनी टीका केली. ते काही माझ्या पक्षाचे नाही. मुंडेंना कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य राहिलं नाही. त्यांचं विमान ५४ हजाराऐवजी ६० हजारावर गेलं आहे. मी त्यांच्या गिरेबानमध्ये झाकून बघत नाही”, असे सुरेश धस म्हणाले.
“मी प्राजक्ता माळींना प्राजक्ता ताई म्हटलं”
“हा विषय कुठे नेऊच नका. एखाद्या महिलेचा अवमान होईल असं मी बोललो नाही. त्यांनी माझा बाईट पाहावा. त्यांना काही वावगं वाटलं तर त्यांनी महिला आयोगाकडे जावं. बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलं आहे. त्याउपर काही ठरवलं तर मला हरकत नाही. मी त्यांचा हास्य जत्रा कार्यक्रम पाहत असतो. एक मराठी मुलगी वर जाते याचा अभिमान आहे. पण त्याउपरही त्या आयोगाकडे गेल्या तर मी सामोरे जाईल. मी चुकीचं बोललो नाही. माझी बाजू मांडेल. मी प्राजक्ता माळींना प्राजक्ता माळी नाही म्हटलं प्राजक्ता ताई म्हटलं”, असेही सुरेश धस यांनी म्हटले.
“ही घटना राजकारणाचा विषय नाही”
“मला दीड वाजता बावनकुळेंचा फोन आला. बोलणं झालं नाही. मी ट्राय करतो. पण मी काही चुकीचं करणार नाही. माझ्या बोलण्याचं काही चुकीचं वाटलं असतं तर मला पक्षाने थांब म्हटलं असतं. ही घटना राजकारणाचा विषय नाही”, असेही सुरेश धस यांनी सांगितले.