महायुती सरकारनं विश्वासदर्शक ठराव सहज जिंकला!
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं सोमवारी विधानसभेत आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव सहज जिंकला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार उदय सामंत, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, भाजपचे संजय कुटे आदींनी विश्वासदर्शक ठराव मांडला.
तो आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. सभागृहानं विश्वासदर्शक ठराव मंजूर केल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.
‘विश्वासदर्शक ठराव बहुमतानं मंजूर झाला आहे. राज्यपालांच्या भाषणानंतर विधानसभेचे कामकाज आता तहकूब होणार असून ते पुन्हा सुरू होईल, असं नार्वेकर यांनी विधानसभेत सांगितलं. २८८ सदस्यांच्या विधानसभेत महायुतीकडे २३० आमदारांचे प्रचंड बहुमत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
पंधराव्या विधानसभेचा कार्यकाळ ७ डिसेंबरपासून अधिकृतपणे सुरू झाला. २८८ सदस्यांच्या कनिष्ठ सभागृहात भाजपप्रणित आघाडीला २३० जागा मिळाल्यानं बहुमत चाचणी ही केवळ औपचारिकता होती.
कोणाकडं किती आमदार?
नार्वेकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानं महायुतीकडे आता छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांसह २२९ आमदारांचा पाठिंबा आहे. महाराष्ट्र विधानसभेतील सत्ताधारी महायुतीमधील भाजपकडं १३२, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडं ५७ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडं ४१ आमदार आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाकडं दोन, राष्ट्रीय समाज पक्ष, राजर्षी शाहू विकास आघाडीकडं प्रत्येकी एक जागा आहे, तर दोन अपक्षांचा सरकारला पाठिंबा आहे.
विरोधी महाविकास आघाडीतील काँग्रेसकडं १६, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडं २० आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं १० जागा आहेत. समाजवादी पक्षानं दोन जागा जिंकल्या आहेत. पीडब्ल्यूपीला १, एमआयएमला १ तर सीपीएमला एक १ मिळाली आहे. यापैकी समाजवादी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडला आहे.