महायुतीच्या मंत्र्यांची संभाव्य यादी: भाजपचे ‘हे’ आमदार होणार मंत्री तर शिवसेनेला मिळणार ‘ही’ महत्त्वाची खाती
पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा (Ministry) शपथविधी पार पडणार आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्र्यांचं (CM) नाव गुलदस्तात आहे. त्याचबरोबर कोणत्या पक्षाला किती आणि कोणती मंत्री पद (MINISTERS LIST) मिळणार याचा सस्पेन्स देखील कायम आहे.
मात्र आता विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्या पक्षांच्या किती नेत्यांना कोणती मंत्रिपदं मिळणारं याची संभाव्य यादी समोर आली आहे.
मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले हे नेते
भाजपच्या गोटातील ज्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे त्यांची नावं समोर आली आहेत. सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, आशिष शेलार, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, संजय कुटेंसह पंकजा मुंडे, देवयानी फरांदे या महिला आमदारांची नावं देखील मंत्रिपदाच्या चर्चेत आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या उदय सामंत, दादा भुसे, भरत गोगावले, दीपक केसरकर यांची नावं चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, सुनील शेळके, राहुल कुल यांची नावं चर्चेत आहेत.
शिवसेनेला मिळणाऱ्या खात्यांची संभाव्य यादी
भाजप मुख्यमंत्रीपदासह गृह खातं स्वतःकडे ठेवणार आहे. मात्र याच गृहमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्ष गृहमंत्री पद मिळवण्यासाठी आग्रही आहेत. मात्र दुसरीकडे शिवसेनेला नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, कृषी, उद्योग, राज्य उत्पादन शुल्क, उच्च आणि तंत्रशिक्षण, सामाजिक न्याय आणि रोजगार हमी ही खाती मिळणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर भाजप मुख्यमंत्रीपदासह गृह खातं, ओबीसी मंत्रालय आणि महसूल खातं स्वतःकडे ठेवणार असल्याची शक्यता आहे. तर विधानसभा अध्यक्षपद आणि विधान परिषद सभापती या दोन्ही पदांसाठी नावं निश्चित झालेली नाही. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी या पदांसाठी दावा करू शकते. तर भाजप ही स्वतःकडे ठेवण्यासाठी आग्रही असू शकतं.
तीन तारखेला भाजपच्या आमदारांची बैठक होणार असून त्यामध्ये गटनेता ठरवला जाणार आहे. तर चार तारखेला मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आणि कोण मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार हे येत्या तीन-चार दिवसात स्पष्ट होईल.