‘माझ्याकडे सुपर पॉवर’, म्हणत इंजिनअरिंगच्या विद्यार्थ्याने चौथ्या मजल्यावरून मारली उडी, पुढे काय घडल ?
तमिळनाडू राज्यातील मालुमिचंपट्टीजवळ एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने स्वतःमध्ये सुपर पॉवर असल्याचं सिद्ध करण्यासाठी कॉलेज हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली आहे.
या घटनेत संबंधित विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी (28 ऑक्टोबर 2024) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून जखमी विद्यार्थ्याचे नाव ए. प्रभू (वय 19) असं आहे.
ए.प्रभू हा एका खासगी महाविद्यालयामध्ये इंजिनीअरिंगच्या तृतीय वर्षाला आहे. सोमवारी सायंकाळी त्याने मालुमिचंपट्टीजवळील मायलेरीपलायम येथे कॉलेज होस्टेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत त्याचे हातपाय आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभू हा इरोड जिल्ह्यातील पेरुंडुराईजवळील मेक्कूर गावातील रहिवासी आहे. तो कॉलेजच्या होस्टेलमध्येच राहत होता. सध्या त्याला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
गुन्हा दाखल
पोलिसांनी प्रभू याचा मोबाईल फोन ताब्यात घेऊन तपासला असता त्यामध्ये काही व्हिडिओ सापडले आहेत. याबाबत चेट्टीपलायम पोलीस ठाण्यातील अधिकारी करुप्पासामी पांडियन यांनी सांगितलं की, ‘प्रभूने सोमवारी पहाटे चारच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या होस्टेलच्या भिंती, होस्टेलच्या इमारतीची उंची यांचे व्हिडिओ काढले होते. तर, सायंकाळी त्याने होस्टेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. त्यांची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो पूर्ण रिकव्हर होण्यासाठी वेळ लागेल. संबंधित विद्यार्थी प्रचंड नैराश्यात होता. त्यामुळेच त्याने हे टोकाचं पाऊल उचलले असावे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.’
स्वतःकडे सुपरपॉवर असल्याचा दावा
प्रभू असा दावा करीत होता की, त्याच्याकडे सुपरपॉवर आहे. कोणताही इमारतीवरून उडी मारली तरी त्याला दुखापत होणार नाही. गेल्याच आठवड्यात त्याने त्याच्या मित्रांना आणि होस्टेलमधील रुममेट्स यांना सांगितलं होतं की, त्याला जादूटोणा देखील येतो.
अखेर सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कॉलेज होस्टेलच्या चौथ्या मजल्यावरून प्रभूने उडी मारली. यामध्ये त्याच्या हातपायाला आणि डोक्याला दुखापत झाली. ही घटना दोन विद्यार्थ्यांनी पाहिली, आणि त्यांनी तातडीने इतरांना माहिती दिली. त्यानंतर इतर विद्यार्थ्यांनी तातडीने प्रभूला ओथक्कलमंडपम येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला कोईम्बतूर येथील गंगा रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या येथेच प्रभूवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेची परिसरामध्ये चर्चा सुरू आहे. अनेकांना या घटनेचा धक्का बसला आहे.