महावितरणची ‘लाइट’ गेली तरी नो टेन्शन, थेट अंतराळातून मिळणार 24 तास वीज!
आजच्या काळात वीज ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. विजेअभावी आपली जवळपास सर्वच कामं ठप्प होऊ शकतात. त्यामुळे विजेला सातत्याने मागणी असते; पण काही कारणांमुळे अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो आणि त्याचा परिणाम अनेक गोष्टींवर पाहायला मिळतो; पण लवकरच ही समस्या दूर होऊ शकते.
आपल्याला 24 तास अखंडित वीज मिळू शकते. ब्रिटनमधली एक स्टार्टअप कंपनी एका अनोख्या प्रकल्पावर काम करत आहे. यात यश मिळालं, तर 24 तास वीजपुरवठा होऊ शकतो. हा वीजपुरवठा थेट उपग्रहाद्वारे होऊ शकतो. अंतराळात वीजनिर्मिती करून ती उपग्रहाद्वारे वितरित केली जाऊ शकते. यासाठी आणखी एका पर्यायावरदेखील विचार सुरू आहे. पृथ्वीवर कोणताही ऋतू किंवा खराब हवामान असलं, तरी वीजपुरवठा अखंडित राहू शकतो.
थोडासा वादळी पाऊस झाला तरी लगेच वीजपुरवठा खंडित होतो. जगभरात भारतासह अनेक देश या समस्येचा सामना करत आहेत. काही वेळा वादळामुळे झाडांसह विजेच्या तारा, खांबदेखील कोसळतात. यामुळे अनिश्चित काळासाठी वीजपुरवठा खंडित होतो. आता ही समस्या कायमची सुटू शकणार आहे. ऋतू कोणताही असला तरी आपल्याला 24 तास 365 दिवस अखंडपणे वीज उपलब्ध होऊ शकणार आहे.
संशोधकांनी ही अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी काम सुरू केलं आहे. जेव्हा हवामान स्वच्छ असतं, तेव्हाच सू्र्यकिरणं आपल्यापर्यंत पोहोचतात; पण अंतराळात कायम सूर्यप्रकाश आणि त्याची ऊर्जा उपलब्ध असते. त्यामुळे संशोधक अंतराळात वीजनिर्मिती करून ती वीज पृथ्वीवर पोहोचवण्याच्या योजनेवर काम करत आहेत.
अंतराळातून वीजपुरवठा या संकल्पनेवर अमेरिका, जपानसह युरोपातले अनेक देश काम करत आहेत. ब्रिटनमधल्या एका स्टार्टअप फर्मने 2030 पूर्वी यास सुरुवात होईल असा दावा केला आहे. स्पेस सोलरच्या माध्यमातून किफायतशीर, वाढवता येण्याजोगं आणि पूर्णपणे अक्षय ऊर्जा तंत्रज्ञान विकसित करणं, हा ब्रिटनमधल्या स्पेस सोलर फर्मचा उद्देश आहे. स्पेस सोलर इंजिनीअरिंगच्या स्पेस बेस्ड सोलर पॉवर प्रकल्पासाठी ब्रिटन सरकारने या वर्षी एप्रिलमध्ये सुमारे 13 कोटी रुपयांचा निधीदेखील दिला आहे.
अंतराळातून वीजपुरवठ्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे 24 तास वीजपुरवठा करणं शक्य होईल. याशिवाय ही स्वच्छ, हरित ऊर्जा असेल. यामुळे 2050पर्यंत पृथ्वीवरचं कार्बन उत्सर्जन शून्य करण्याच्या दिशेने मोठी मदत होईल. या माध्यमातून ब्रिटनची विजेची गरज पुरेशा प्रमाणात भागू शकते. सोलर स्पेस कंपनीच्या माहितीनुसार, कंपनी 2030पर्यंत पहिला ऑर्बायटल डेमॉन्स्ट्रेटर सॅटेलाइट पाठवणार आहे. त्यात यश मिळालं, तर तो जगातला अक्षय ऊर्जास्रोतासाठीचा पहिला प्रयत्न असेल.
या प्रकल्पांतर्गत कमी दरात विजेचं उत्पादन हे एक मोठं आव्हान असेल. अंतराळात उभारल्या जाणाऱ्या पॉवर स्टेशनचा पाया आकारने खूप मोठा असेल. याशिवाय पृथ्वीच्या कक्षेतून वीज पुरवठा करणाऱ्या उपग्रहांमध्ये एक किलोमीटर लांबीचा ट्रान्समीटर पृष्ठभाग असू शकतो. त्यामुळे हे काम सोपं नसेल. अंतराळात तयार केलं जाणारं पॉवर स्टेशन स्पेस स्टेशनसारखे असेल; पण त्याची किंमत आणि ते तयार करण्यासाठी लागणारा वेळ या दोन्ही गोष्टी स्पेस स्टेशनच्या तुलनेत खूप जास्त असू शकतात. या दृष्टिकोनातून अंतराळातून मिळणारी वीज फारशी स्वस्त नसेल. स्पेस सोलर इंजिनीअरिंग जर हे तंत्रज्ञान कमी खर्चात विकसित करू शकलं तर ही मोठी कामगिरी ठरेल.
या प्रकल्पात संशोधक मोठी सोलर पॅनेल्स लावलेला एक उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करणार आहेत. ही सोलर पॅनेल्स कोणत्याही उपकरणाशिवाय केवळ सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मिती करतील. ही वीज कोणतीही तार किंवा खांबाशिवाय 2.45 गीगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीने पृथ्वीवरील रिसीव्हरकडे पाठवली जाईल. याशिवाय दुसरा पर्यायाचा विचार करता उपग्रहाद्वारे थेट 30 मेगावॉट ऊर्जेची बीम पृथ्वीवर पाठवली जाईल. यामुळे सुमारे तीन हजार घरांपर्यंत वीज पोहोचू शकेल.
स्पेस सोलर इंजिनीअरिंगच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून 2036पर्यंत सहा वीज स्टेशन्स उभारणीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या प्रत्येक स्टेशनसाठी सुमारे 80 कोटी डॉलरपर्यंत खर्च येऊ शकतो. या पॉवर स्टेशनच्या माध्यमातून 24 तास वीजपुरवठा करणं शक्य होईल. पृथ्वीवर कोणताही ऋतू असला तरी त्याचा कोणताही परिणाम वीजपुरवठ्यावर होणार नाही.