JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
JioCinema आणि Disney+ Hotstar यांचे विलिनीकरण होणार आहे. या दोन्ही कंपन्या एकाच प्लॅटफॉर्मवर हा डेटा आणू शकतात अशी चर्चा आहे. जिओ सिनेमातील जिओ आणि डिस्ने हॉटस्टारमधील हॉटस्टार असं त्यांच्या वेबसाईटचं नाव असू शकतं.
असा अंदाज लावून दिल्लीतील एका डेव्हलपरनं ही डील होण्यापूर्वीच Jiohotstar हे डोमेन खरेदी करून ठेवलं आहे. या व्यक्तीनं जिओची मूळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला एस मेसेज केला होता. यामध्ये त्यानं हे डोमेन विकण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. यानंतर आता रिलायन्सनं त्याला कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्याचं म्हटलं जात आहे.
गेल्या वर्षी खरेदी केलेलं डोमेन
JioHotstar डोमेन नेमसोबत एक साधं लँडिंग पेज होतं. त्यात डेव्हलपरचा एक मेसेज होता. गेल्या वर्षी त्यानं विलीनीकरणाबद्दल पहिल्यांदा ऐकलं तेव्हा त्यानं हे डोमेन विकत घेतले होतं असं त्यात लिहिलं होतं. “जेव्हा मी पाहिलं की हे डोमेन उपलब्ध आहे, तेव्हा मला वाटलं की सगळं ठीक होऊ शकतं. हे डोमेन विकत घेण्याचा माझा हेतू सोपा होता. जर हे विलीनीकरण झालं तर मी केंब्रिजमध्ये शिकण्याचं माझं स्वप्न पूर्ण करू शकेन,” असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं.
गुरुवारी वेबसाइटवर एक अपडेट पोस्ट करण्यात आले. रिलायन्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं संपर्क साधल्यानंतर डेव्हलपरनं ९३,३४५ पौंड्स म्हणजे १.०१ कोटी रुपयांची मागणी केल्याचं त्यात म्हटलं. ही त्या कोर्सची फी आहे. “२४ ऑक्टोबर पर्यंतची अपडेट: रिलायन्सचे एक कार्यकारी अधिकारी एव्हीपी, कमर्शिअल्स अंबुजेश यादव यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्याकडे ईएमबीए प्रोग्रामच्या ट्युशन फी इतकी ९३,३४५ पौड्सची फी मागण्यात आली,” असंही त्यानं म्हटलं.
रिलायन्सनं काय म्हटलं?
डेव्हलपरनं दिलेल्या माहितीनुसार रिलायन्सनं ही मागणी फेटाळली आणि त्याला कायदेशीर कारवाईचीही धमकी दिली. “रिलायन्सनं ही मागणी फेटाळली आहे. रिलायन्स कायदेशीर कारवाई करेल. ते पुनर्विचार करतील अशी मला अपेक्षा आहे. इतका मोठ्या समूहानं मदत केली असती. ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांना धन्यवाद. रिलायन्सच्या विरोधात उभं राहण्याची माझी ताकद नाही,” असंही त्यानं म्हटलं.
त्यानं कायदेशीर मदतही मागितली आहे. “२०२३ मध्ये जेव्हा मी ते खरेदी केवंस मी कोणत्याही ट्रेडमार्कचं उल्लंघन केलं असं वाटत नाही. JioHotstar तेव्हा अस्तित्वात नव्हतं. JioHotstar साठी कोणताही ट्रेडमार्क नव्हता. जर कोणी मला कायदेशीर मदत केली तर त्याचा मी आभारी राहिन,” असंही त्या डेव्हलपरनं म्हटलं.