ताज्या बातम्या

रशियाच्या मदतीसाठी उत्तर कोरिया सरसावला; किम जोंग यांनी पाठवले आपले 12000 सैनिक


Russia-Ukraine : रशिया आणि युक्रेनमध्ये दोन वर्षांहून अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत कोणत्याही देशाला निर्णायक आघाडी घेता आलेली नाही. एकीकडे पाश्चिमात्य देश युक्रेनला सातत्याने शस्त्रे पुरवत आहेत, तर दुसरीकडे रशियालाही आता या युद्धात मोठी मदत मिळाली आहे.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाला मदत करण्यासाठी हजारो सैनिक पाठवल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि किम जोंग यांची भेट झाली होती.

 

किती सैनिक पाठवले?
युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाला मदत करण्यासाठी उत्तर कोरियाने 12,000 सैनिक पाठवले आहेत, असे दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियाच्या योनहाप न्यूज एजन्सीने शुक्रवारी ही माहिती दिली आहे. वृत्तसंस्थेने नॅशनल इंटेलिजेंस सर्व्हिस (NIS) च्या इनपुटचा हवाला देत सांगितले की, उत्तर कोरियाचे सैन्य रशियाला मदत करण्यासाठी रशियात दाखल झाले आहे.

 

दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांची बैठक
उत्तर कोरियाने रशियाला मदत करण्यासाठी सैन्य पाठवल्याच्या मुद्द्यावर दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी तातडीची बैठक घेतली आहे. राष्ट्रपती युन सुक येओल यांच्या कार्यालयाने म्हटले की, राष्ट्रपतींनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. उत्तर कोरियाने रशियाला सैन्य पाठवण्याचे वृत्त सरकारने खरे मानले आहे की नाही, याची अद्याप सरकारने पुष्टी केलेली नाही.

 

ऑस्ट्रेलिया युक्रेनला रणगाडे देणार
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने युक्रेनला त्यांचे अब्राम रणगाडे देण्याची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांनी सांगितले की, युक्रेनने काही महिन्यांपूर्वी हे रणगाडे देण्याची विनंती केली होती. ऑस्ट्रेलियन सरकार युक्रेनला त्यांचे अमेरिकन बनावटीच्या M1A1 रणगाडे देत आहे, ज्यांची किंमत 245 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button